शिवाजी विद्यापीठातील ‘शिक्षणशास्त्र’ करणार कौशल्य विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:43+5:302021-04-28T04:25:43+5:30
कोल्हापूर : युरोपियन युनियनच्या ‘इरॅस्मस प्लस’ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाला १ कोटी २० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य ...

शिवाजी विद्यापीठातील ‘शिक्षणशास्त्र’ करणार कौशल्य विकास
कोल्हापूर : युरोपियन युनियनच्या ‘इरॅस्मस प्लस’ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाला १ कोटी २० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे, अशी माहिती प्रकल्प समन्वयक डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी मंगळवारी दिली.
या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक पंजाबमधील चित्कारा विद्यापीठ आहे. यामध्ये शिक्षणशास्त्र विभागासह इटली, लेविटिया, फिनलँड, जर्मनीमधील विद्यापीठे व स्कूल भागीदार आहेत. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व सेवांतर्गत शिक्षकांमध्ये २१ शतकातील कौशल्ये विकसित करणे हा आहे. त्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक, पृथक्करण, सृजनशील विचारकौशल्ये विकासासाठी प्रशिक्षकांना तयार करणे, त्यासाठी विविध अध्यापनशास्त्रीय पद्धती, साधने, तंत्रे यांचा युरोपियन, भारतीय सहकाऱ्यांच्या साहाय्याने शोध घेणे, नव्याने शोधलेल्या अध्यापनशास्त्रीय पद्धतीचे भारतीय सामाजिक परिस्थितीमध्ये समायोजन व समावेशन केले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत यांचे मार्गदर्शन लाभत आहे, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.
चौकट
विद्यार्थी, शिक्षकांना सुसज्ज करणे
पदवी, पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रमांमध्ये सुधारणा व नवीन पद्धतींचा समावेश करण्यासाठी कॅस्केड प्रतिमानाचा वापर करून ज्ञान, कौशल्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक व सेवांतर्गत शिक्षक यांना सुसज्ज करणे, त्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांचा सल्ला घेणे, मार्गदर्शन करणे या बाबींचा अवलंब करण्यात येणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षणशास्त्र अधिविभाग आंतरराष्ट्रीय स्तरावरील काम करणार असल्याची माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.