शिवाजी विद्यापीठ घेणार आजपासून पुनर्परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST2021-09-16T04:31:54+5:302021-09-16T04:31:54+5:30
कोल्हापूर : काही तांत्रिक कारणास्तव शिवाजी विद्यापीठाची परीक्षा देता आली नसलेल्या ८,८४५ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी परीक्षा व ...

शिवाजी विद्यापीठ घेणार आजपासून पुनर्परीक्षा
कोल्हापूर : काही तांत्रिक कारणास्तव शिवाजी विद्यापीठाची परीक्षा देता आली नसलेल्या ८,८४५ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेत, त्यांची पुनर्परीक्षा आज (गुरूवार)पासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. बी. व्होक फूड प्रोसेसिंग ॲण्ड मॅनेजमेंट, एम. ए. इंग्रजी अशा विविध तीस अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल विद्यापीठाने बुधवारी ऑनलाईन जाहीर केले.
एम. एस्सी. अल्कोहोल टेक्नॉलॉजी, बी. एस्सी अथवा एम. एस्सी. नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, एम. एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी, एम. बी. ए. रूरल मॅनेजमेंट, एम. बी. ए. डिस्टन्स मोड आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी एकूण ९८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७३६ जणांनी परीक्षा दिली. उन्हाळी सत्रातील बी. एस्सी., एम. एस्सी. (नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाची १२१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. एम. ए. राज्यशास्त्र, एम. कॉम., एम. एस्सी. बॉटनी, एम. एस्सी. ॲग्रो केमिकल ॲण्ड पेस्ट मॅनेजमेंट, एमसीए, एम. ए., एम. एस्सी., एम. एम. मराठी, हिंदी (सत्र तीन आणि चार), डिप्लोमा इन सायबर लॉ, लेबर लॉ अशा विविध ३० परीक्षांचे ऑनलाईन निकाल विद्यापीठाने जाहीर केले.
विद्यार्थ्यांना आवाहन
पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ, स्वत:चा ई-मेल, नोंदणीकृत मोबाईलवर येणाऱ्या परीक्षांबाबतच्या सूचना वारंवार पाहाव्यात. अद्याप ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झालेली नाही, त्यांनी मॉक टेस्ट द्यावी, असे आवाहन परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.