शिवचरित्राचा सूक्ष्म अभ्यास ‘शिवाजी द ग्रेट’मध्ये

By Admin | Updated: September 23, 2016 00:55 IST2016-09-23T00:54:33+5:302016-09-23T00:55:11+5:30

इंद्रजित सावंत यांचे मत : उद्या होणार प्रकाशन समारंभ

In Shivaji The Great, the study of Shivcharitra | शिवचरित्राचा सूक्ष्म अभ्यास ‘शिवाजी द ग्रेट’मध्ये

शिवचरित्राचा सूक्ष्म अभ्यास ‘शिवाजी द ग्रेट’मध्ये

कोल्हापूर : मुलतान, पंजाबसारख्या दूरच्या प्रदेशातून आलेल्या व लंडन विद्यापीठातून पीएच.डी. केलेल्या डॉ. बाळकृष्ण यांनी लिहिलेला ‘शिवाजी द ग्रेट’ हा ग्रंथ म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा सूक्ष्म अभ्यास आहे, असे मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने पुनर्संपादित केलेल्या पाच खंडांमधील या नव्या स्वरूपातील ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी इतिहास अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे असतील. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार नीतेश राणे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राजाराम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’ या शिवचरित्राच्या पुनर्संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. मुलतान-पंजाबमधील आर्य समाजिस्ट डॉ. बाळकृष्ण यांनी सन १९३२ ते १९४० च्या दरम्यान शककर्ते शिवरायांचे चरित्र ‘शिवाजी द ग्रेट’ या नावाने चार खंडांत प्रसिद्ध केले होते. मात्र, दुर्दैवाने काळाच्या ओघात हे महान शिवचरित्र विस्मरणात गेले होते. ते पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचे काम सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने केले आहे. जगभरातून ‘शिवाजी द ग्रेट’च्या प्रती मिळविल्या. त्यातून नव्याने १६८० पानांच्या पाच खंडांच्या या ग्रंथाच्या पुनर्संपादनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.


बाळकृष्ण यांचे विस्मरण
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र इंग्रजीमध्ये फारसे उपलब्ध नाही. डॉ. बाळकृष्ण यांनी मात्र १९३२ साली ते लिहिले. त्याकाळी छपाईतंत्र विकसित झाले नसल्याने त्यांनी पोर्तुगाल, डच येथून लेखनछपाईचे साहित्य मागविले. महाराजांचा इतिहास ज्या-ज्या ठिकाणी घडला, तेथे प्रत्यक्ष जाऊन त्यांनी ते लिहिले. त्यात त्यांनी शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे आदराचे स्थान विशद केले आहे. मात्र, हे ग्रंथ कालौघात विस्मरणात गेले. ते उपलब्ध झाले असते तर जेम्स लेन प्रकरण घडले नसते. विद्यापीठाची स्थापना, बी. टी. कॉलेज, लॉ कॉलेजची संकल्पना डॉ. बाळकृष्ण यांचीच. कोल्हापूरच्या शैक्षणिक चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या बाळकृष्ण यांचा कोल्हापूरकरांना मात्र विसर पडला आहे.

Web Title: In Shivaji The Great, the study of Shivcharitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.