‘शिवाजी’ची ‘फुलेवाडी’वर मात : चुरशीच्या लढतीत २-0 ने नमविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:32 IST2019-02-27T00:27:59+5:302019-02-27T00:32:33+5:30
संदीप पोवार, करण चव्हाण-बंदरे, संकेत साळोखे यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २-० असा पराभव करीत अटल चषक

‘शिवाजी’ची ‘फुलेवाडी’वर मात : चुरशीच्या लढतीत २-0 ने नमविले
कोल्हापूर : संदीप पोवार, करण चव्हाण-बंदरे, संकेत साळोखे यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २-० असा पराभव करीत अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आगेकूच सुरू ठेवली.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी या दोन संघांत साखळी फेरीतील सामना झाला. प्रारंभापासून दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. मात्र, शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंना यश आले. यात तिसऱ्या मिनिटाला शिवाजीकडून संदीप पोवारने मारलेल्या फ्री किकवर संकेत साळोखेने हेडद्वारे उत्कृष्ट गोलची नोंद करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फुलेवाडीकडून संकेत वेसणेकर याने मारलेला फटका पोलवरून गेला. तर मंगेश दिवसेनेही हेडद्वारे गोल करण्याचा अप्रतिम प्रयत्न केला. मात्र, हा चेंडू बाहेर गेला.
शिवाजीकडून करण चव्हाण-बंदरे याने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. प्रतिआक्रमणात फुलेवाडीकडून अक्षय मंडलिकचा फटका शिवाजीचा गोलरक्षक निखिल खन्ना याने हवेत उंचावून बाहेर काढला. उत्तरार्धात शिवाजीकडून संदीप पोवार, करण चव्हाण बंदरे, संकेत साळोखे यांनी आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. तर फुलेवाडीकडून बरोबरी साधण्याचा प्रयत्न झाला. फुलेवाडीच्या संकेत नितीन साळोखे याला गोल करण्याची नामी संधी आली होती. मात्र, शिवाजीचा गोलरक्षक खन्ना याने पुढे येत त्याचे गोल करण्याचे इरादे परतवून लावले. ७० व्या मिनिटास शिवाजीकडून करण चव्हाण-बंदरेने दिलेल्या पासवर संदीप पोवारने गोल करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवत शिवाजीने सामना जिंकला.
कोल्हापुरातील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी शिवाजी तरुण मंडळ व फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.