शिवसेनेतर्फे आज कोल्हापुरात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:17+5:302021-01-08T05:23:17+5:30
कोल्हापूर: बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका, नगरपालिका, प्रादेशिक नगररचना आदी क्षेत्रांकरिता एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली ...

शिवसेनेतर्फे आज कोल्हापुरात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार
कोल्हापूर: बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका, नगरपालिका, प्रादेशिक नगररचना आदी क्षेत्रांकरिता एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संपूर्ण राज्यात लागू केल्याबद्दल कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने आज (शुक्रवारी) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे सायंकाळी ८.०० वाजता चांदीची तलवार, भगवा फेटा, शाल, श्रीफळ देऊन शिंदे यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मंत्री शिंदे यांच्या भव्य स्वागताची तयारी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेणार आहेत. तसेच शिवसेना कसबा बावडा कार्यालय, रवी इंगवले यांच्या घरी भेट आणि शहर कार्यकारिणीचा सत्कार साेहळाही त्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
सकाळी साडेदहा वाजता कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल कॅम्पस येथून मंत्री शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. पावणे अकरा वाजता महापालिकेत आयुक्त व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होणार आहे. येथून पुढे सव्वाएकपर्यंत कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तेथून शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात साडेतीन वाजेपर्यंत नगर परिषद व नगर पंचायती संदर्भात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. वेस्टर्न चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि क्रीडाईतर्फे मंत्री शिंदे यांचा सायंकाळी सत्कार होेणार आहे. अंबाबाई दर्शनानंतर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम असणार आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता ते सांगलीकडे रवाना होणार आहेत.