कोपार्डेत शिवसेना-काँग्रेस सरळ लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:07+5:302021-01-04T04:20:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : जिल्ह्यातील प्रसिद्ध जनावरांंचा बाजार व इतर उत्पन्नाचे मोठे स्रोत असणाऱ्या कोपार्डे (ता. करवीर) येथील ...

कोपार्डेत शिवसेना-काँग्रेस सरळ लढत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : जिल्ह्यातील प्रसिद्ध जनावरांंचा बाजार व इतर उत्पन्नाचे मोठे स्रोत असणाऱ्या कोपार्डे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व काँग्रेस अशी सरळ लढत होत आहे. एकहाती सत्ता आणण्यासाठी शिवसेना व काँग्रेसमधील नेत्यांना कस लावावा लागणार आहे. उमेदवार निवडीबाबत चोखंदळपणा व ज्या-त्या प्रभागात किमान एक गट्टा मतदानावर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
कोपार्डे गाव तसे संवेदनशील म्हणून ओळखले जात असले तरी दैनंदिन व्यवहारात आडवाआडवीचे राजकारण होताना दिसत नाही. कोपार्डे गावात जनावरांचा मोठा बाजार आहे. कुंभी कासारी साखर कारखाना, मोठ्या शैक्षणिक संस्था, जनावरांचा बाजार यामुळे छोट्या-मोठ्या व्यवसायांना संधी निर्माण झाली आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांनी स्थानिकांच्या हातून राजकारण बाजूला जाऊ नये यासाठी ऐक्य ठेवले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व ‘कुंभी’चे संचालक विलास पाटील, बाजीराव पाटील हे शिवसेनेचे नेतृत्व करीत आहेत, तर काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस. के. पाटील, माजी पोलीस पाटील नामदेव पाटील व सागर जामदार एकत्र आले आहेत.
.....................
एकास एक उमेदवारासाठी चाचपणी
अटीतटीच्या राजकारणात पेयजल योजना मागे गेली. गावात मोठे गायरान आहे, पण गेल्या ४५ वर्षांपासून गावठाण वाढीसाठी प्रयत्न झालेले नाहीत. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जनावरांच्या बाजारात मूलभूत सुविधांंची वानवा आहे. उत्पन्नाचा मोठा स्रोत असल्याने आपल्या हातात सत्ता घेण्यासाठी दोन्ही गटांकडून तुल्यबळ लढतीसाठी एकास एक उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
-
एकूण मतदान --३३४०
प्रभाग -- ५
सदस्य ---१३
-