घरफाळ्यातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड, शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 17:57 IST2020-01-27T17:54:05+5:302020-01-27T17:57:50+5:30
महानगरपालिका घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दोन मिळकतींचा घरफाळा चुकीचा आकारल्याचा भांडाफोड केला.

घरफाळ्यातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड, शिवसेना आक्रमक
कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दोन मिळकतींचा घरफाळा चुकीचा आकारल्याचा भांडाफोड केला.
उपायुक्त, सहायक आयुक्त व करसंग्राहक अशा तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जागेवर नेऊन दोन मिळकतींचा घरफाळा आकारणीत कशा चुका केल्या आहेत याची माहिती दिली.
ज्यांनी जाणीवपूर्वक मोठ्या करदात्यांचा घरफाळा कमी करून महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांवर आठ दिवसात फौजदारी कारवाई केली नाही, तर शिवसेनेतर्फे न्यायालयात खासगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
यावेळी सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, मेघा पेडणेकर, शुभांगी पोवार, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, राजू यादव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.