शूर आम्ही सरदार..करतो राजेंचा जयजयकार, कोल्हापुरात शिवाजी पेठेच्या मिरवणुकीने वातावरण शिवमय 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:05 PM2024-02-20T12:05:11+5:302024-02-20T12:05:27+5:30

ढोल-ताशा, घुमकं, कैताळ, हलगीने आणली रंगत; विदेशी जोडप्यालाही भुरळ

Shiv Jayanti in Kolhapur On the occasion, the procession to Shivaji Peth was enthusiastic | शूर आम्ही सरदार..करतो राजेंचा जयजयकार, कोल्हापुरात शिवाजी पेठेच्या मिरवणुकीने वातावरण शिवमय 

शूर आम्ही सरदार..करतो राजेंचा जयजयकार, कोल्हापुरात शिवाजी पेठेच्या मिरवणुकीने वातावरण शिवमय 

कोल्हापूर : आक्रमक चढाईच्या आवेशातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, उंटांसह घोड्यांवर स्वार झालेले अनेक ऐतिहासिक वेशातील बालशिवाजी, ढोल-ताशा, लेझीम, बालशिवाजींना घेऊन बग्गीत बसलेल्या जिजाऊ मॉंसाहेब, बॅण्डपथक आणि डॉल्बीवरील शिवगीतांनी शिवाजी पेठेच्या शिवजयंती मिरवणुकीत सोमवारी वेगळेच रंग भरले. मिरवणुकीसाठी कार्यकर्त, महिलांची मोठी गदी दिसून येत होती.

संध्याकाळी पावणेसहादरम्यान शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे, यशराजराजे, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, कृष्णराज महाडिक, मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उत्सव समिती अध्यक्ष राहुल जरग, उपाध्यक्ष ऋषिकेश नलवडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा प्रारंभ झाला.

मराठमोळ्या मुलींचे लेझीम पथक, धनगरी ढोल, चार उंट, नऊ घोडे, त्यावरील शिवराय, चालत जाणारे मावळ्यांचे पथक. साळोखे यांचे बॅण्डपथक आणि त्यावरील ऐतिहासिक, मराठमोळी गीते, अब्दागिरी हाती घेतलेले भगव्या वेशातील मावळे, अशी पथके यामध्ये सहभागी झाली होती. ढोल-ताशा, घुमकं, कैताळ, हलगी, लेझीमच्या निनादाने वातावरणात मोठी रंगत आणली. सर्व मान्यवरांनी अर्धशिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले. यावेळी शहाजीराजे हेदेखील उपस्थित होते.

या ठिकाणी मर्दाना राजा सुहास ठोंबरे आखाड्याच्या मुलींनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले. बॅण्डवरील ‘शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती’ या गीताने तर मिरवणुकीदरम्यान सर्वांना ताल धरायला लावला. मिरवणुकीत सातत्याने ‘ही माझी शिवाजी पेठ’ हे पेठवरील गाणेही लावले जात होते. सायंकाळी सातच्या सुमारास निम्म्या महाद्वारावर मिरवणुकीची सुरुवात असताना दुसरे टोक अर्धशिवाजी पुतळ्याजवळ होते. 

पापाची तिकटी, महापालिका, आईसाहेबांच्या पुतळ्यापासून बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गुजरीमार्गे मिरवणूक पुन्हा शिवाजीपेठेत नेण्यात आली. यावेळी चंद्रदीप नरके, सुरेश साळोखे, उदय साळोखे, चंद्रकांत साळोखे, विक्रम जरग, दत्ताजी टिपुगडे, धनाजी दळवी, कमलाकर पाटील, बाजीराव चव्हाण, रविकिरण इंगवले, व्याख्यान समितीचे बलराज साळोखे, अजित खराडे, मोहन साळोखे, चंद्रकांत जगदाळे, विजय माने, अनिकेत सरनाईक, रवींद्र साळोखे, अक्षय मोरे, महेश निकम, बबन मोरे, भरत जाधव, संग्राम जरग, अभिषेक इंगवले, योगेश इंगवले, राजू जाधव, शाहू पाटील, श्रीकांत मोहिते, चंद्रकांत सूर्यवंशी, चंद्रकांत यादव, राजू सावंत, श्रीकांत भोसले, लाला गायकवाड, उत्तम कोराणे, पंडित बोंद्रे यांच्यासह माजी नगरसेवक, शिवाजी तरुण मंडळ, उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

छायाचित्रे, सेल्फीसाठी झुंबड

घोडे आणि उंटांवर अनेक बालकांना शिवाजी आणि जिजाऊंच्या वेशभूषेत बसवण्यात आले होते, तर अनेक हौशी पालकांनी आपल्या मुला-मुलींना ऐतिहासिक वेशभूषा करून आणले होते. त्यामुळे या सर्वांचे फोटो काढण्यासाठी, सेल्फीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसून येत होते.

पेठेतील आबालवृद्ध मिरवणुकीत

शिवाजी पेठेची शिवजयंती मिरवणूक ही पेठेच्या अस्मितेचा भाग असल्यामुळे पेठेतील आबालवृद्ध या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक पारंपरिक पेहरावामध्ये दिसत होते. आकडेबाज मिशा, डोक्यावर फेटा, डोळ्याला गॉगल, गळ्यात शिवरायांचे लॉकेट, कपाळावर आडवे शिवगंध रेखाटलेले युवकही मोठ्या संख्येने मिरवणुकीत होते.

विदेशी जोडप्यालाही भुरळ

निवृत्ती चौकामध्ये मिरवणुकीदरम्यान एक विदेशी जोडपे होते. हे दोघेही इंग्लंडवरून आल्याचे सांगण्यात आले. या मिरवणुकीची छायाचित्रे हे दोघेही हौसेने घेत असल्याचे यावेळी दिसून आले, तसेच युवक, युवतीही मोबाइलवर सातत्याने चित्रीकरण करत होत्या.

Web Title: Shiv Jayanti in Kolhapur On the occasion, the procession to Shivaji Peth was enthusiastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.