शिरोली नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली
By Admin | Updated: January 24, 2015 00:19 IST2015-01-24T00:17:23+5:302015-01-24T00:19:05+5:30
कृती समितीचे ठिय्या आंदोलन : जोरदार घोषणाबाजी; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पिटाळले ; तासभर तणाव

शिरोली नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली
कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी शिरोली टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन केले. टोलविरोधात जोरदार घोषणबाजी करीत आंदोलकांनी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी माघार घेतली. आंदोलनामुळे सुमारे तासभर नाका ‘टोल फ्री’ राहिला.
टोलविरोधी कृती समितीच्या एका सदस्याबरोबर शिरोली टोलनाक्यावर काल, गुरुवारी टोल देण्यावरून वादावादी झाली होती. हा प्रकार समजताच टोल समितीच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याकडे धाव घेतली होती. काही वेळ टोलवसुलीही बंद पाडली. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर प्रकरण मिटले होते. मात्र, पोलिसांनी ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही. याचे पडसाद आज, शुक्रवारी आंदोलनाच्या रूपाने पुन्हा उमटले.
दुपारी चारच्या सुमारास नाक्यापासून शंभर मीटर अंतरावर ठिय्या आंदोलन करीत कार्यकर्त्यांनी टोलविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यास सुरुवात केली. विस्कळित झालेली वाहतूक सुरळीत
करण्यासाठी पोलिसांनी विनंती करीत आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला घेत, एका बाजूने वाहनांना वाट करून दिली. रस्त्याच्या बाजूला टोलविरोधात कार्यकर्ते घोषणाबाजी करीत असतानाच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ढवण, सुनील मोरे, आदी कार्यकर्त्यांनी नाक्याकडे धाव
घेतली.
कृती समितीचे कार्यकर्ते नाक्याकडे चाल करून येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी धूम ठोकली. या कर्मचाऱ्यांमागून कार्यकर्तेही पळत सुटले. अखेर वाट दिसेल तिकडे जीव मुठीत घेऊन कर्मचारी पसार झाले. कर्मचारी पळून जाताच कार्यकर्त्यांनी ‘कुठाय तो कालचा माणूस... मॅनेजर कुठाय... आता का बिळात बसलाय...?’ असे म्हणत आव्हान देण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाल्याने केबिनमधील कॅशिअर्सनीही पावत्या व रोख रक्कम ताब्यात घेत केबिन्स रिकाम्या केल्या. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
यानंतर कार्यकर्त्यांनी नाक्याच्या पलीकडे पोलिसांसाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लपलेल्या व्यवस्थापकाला गाठले. ‘क ोल्हापुरात दादागिरी चालणार नाही... पुन्हा दमदाटी करण्याचा प्रकार घडला तर याद राखा, गाठ कोल्हापूरकरांशी आहे...’ असा दम दिला. अखेर पोलिसांनी व्यवस्थापकाची आंदोलकाच्या तावडीतून सुटका केली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी आंदोलकांशी चर्चा के ली. पोलीस कारवाई करतील, असे ठोस आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा इंदुलकर, बाबासाहेब पाटील (भुयेकर), अशोक पोवार, बाबा पार्टे, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, चंद्रकांत बराले, बजरंग शेलार, जयकुमार शिंदे, अशोक रामचंदानी, आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. नगरसेवक सत्यजित कदम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)