शिरढोण खुनाचा उलगडा अद्याप नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:05+5:302021-02-05T07:04:05+5:30
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतमजूर महिलेचा धारदार शस्त्राने खून करून पाच दिवस उलटले तरी अद्याप खुनाचा उलगडा ...

शिरढोण खुनाचा उलगडा अद्याप नाही
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतमजूर महिलेचा धारदार शस्त्राने खून करून पाच दिवस उलटले तरी अद्याप खुनाचा उलगडा झाला नाही. त्यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
येथील शेतमजूर महिला शोभा सदाशिव खोत (वय ४२) हिचा शनिवारी (दि. २३) गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या किशोर माणगावे यांच्या शेतात दुपारी अज्ञाताने धारदार शस्त्राने मानेवर पाठीमागून वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.
खुनाची घटना चारच्या सुमारास कुरुंदवाड पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचा मोबाइल जप्त केला. मोबाइलवरून खुन्यापर्यंत पोहोचून खुनाचा उलगडा लगेच होईल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, खुनाची घटना घडून पाच दिवस उलटले तरी खुनी शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. पाच दिवसांत मोबाइलवरील आलेले कॉल्स संबंधित सर्वांची पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, खुनी कोण आहे, याचा शोध अद्याप लागलेला नाही. खुनी हा सराईत नसणार असे असले तरी पोलिसांना शोध का घेता आला नाही, असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारीत असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतच शंका उपस्थित केली जात आहे.