...तर शिंगणापूर उपसा केंद्र बंद पाडू : ग्रामस्थ
By Admin | Updated: July 4, 2015 00:46 IST2015-07-04T00:23:53+5:302015-07-04T00:46:12+5:30
हद्दवाढीला विरोध : वीस गावांतील ग्रामस्थ एकवटले

...तर शिंगणापूर उपसा केंद्र बंद पाडू : ग्रामस्थ
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावरून ‘शहरी व ग्रामीण’ असा वाद आता अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा काही नगरसेवकांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून, जर पाणीपुरवठा बंद केला तर शिंगणापूर हद्दीत असलेले महानगरपालिकेचे पाणी उपसा केंद्र बंद पाडले जाईल, असा इशारा २० गावांतील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला. करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तसेच २० गावांतील सरपंच, उपसरपंच, आदींच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांची भेट घेऊन शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीस ठाम विरोध दर्शविला.तसे लेखी निवेदनही त्यांना देण्यात आले. शहराचा विकास करायला महानगरपालिकेला जमले नाही. आता आमची गावे घेऊन काय विकास करणार आहेत? असा सवाल काहींनी केला. हद्दवाढीला आमचा ठाम विरोध आहे. तो विचारात घेतला नाही, तर मात्र सरकारविरोधात न्यायालयात जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.गेल्याच आठवड्यात शहरातील हद्दवाढ कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जर हद्दवाढीला विरोध केला जाणार असेल तर संबंधित गावांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी ग्रामस्थांकडून, शिंगणापूर येथील महानगरपालिकेचे पाणी उपसा केंद्र बंद पाडले जाईल, असा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात करवीर पंचायत समितीच्या सभापती पूनम जाधव, उपसभापती दत्तात्रय मुळीक, माजी सभापती दिलीप टिपुगडे, जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ पाटील, बाबासो माळी, मनीषा वास्कर, पंचायत समिती सदस्य भूजगोंडा पाटील, सचिन पाटील, जयसिंग काशीद, उचगावच्या सरपंच सुरेखा चौगुले, शियेच्या सरपंच लक्ष्मी फडतरे, वडणगेचे उपसरपंच सचिन चौगुले, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
हद्दवाढविरोधी समितीचा उद्या मेळावा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे कळंबा येथील अमृतसिद्धी सभागृहामध्ये उद्या, रविवारी दुपारी एक वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, बाबा देसाई, भगवान काटे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास हद्दवाढीतील प्रस्तावित २० गावांमधील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सूचना व मते विचारात घेण्यात येणार आहेत. तरी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीने पत्रकाद्वारे केले आहे.