शिंदे यांनाच अध्यक्षपदी बसवणार

By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:07+5:302016-03-16T08:36:08+5:30

हसन मुश्रीफ : गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी शेतकरी विकास आघाडीची घोषणा

Shinde will be appointed as president | शिंदे यांनाच अध्यक्षपदी बसवणार

शिंदे यांनाच अध्यक्षपदी बसवणार

गडहिंग्लज : चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा गडहिंग्लज कारखान्यातील राजकारणात कळत-नकळत अपमान झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी त्यांना सन्मानाने कारखान्याच्या अध्यक्षपदी बसवेल, अशी घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.
या कारखान्याच्या निवडणुकीत शिंदे, मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर आणि संग्रामसिंह नलवडे अशी आघाडी झाली. माघारीनंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ‘शेतकरी विकास आघाडी’ची घोषणा केली. मुश्रीफ म्हणाले, प्रकाश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखाना चालवायला दिला. त्यांना पाठिंबा द्यायचा विचार होता. दोन-तीन दिवस चर्चाही केली. परंतु, तडजोड करण्याची त्यांची मानसिकता नव्हती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेतल्यामुळे चव्हाण गट गेला. मात्र, शिंदे व नलवडे आमच्यासोबत असल्यामुळे विजयाची चिंता नाही.
शिंदे म्हणाले, १९८८ पासून सर्व निवडणूक लढवल्या. सभासदांच्या अपेक्षांची जाणीव आहे. ज्या-ज्या पॅनेलमध्ये गेलो ते पॅनेल कधीच हरले नाही. यावेळीही हरणार नाही. जादा दर देण्याच्या इर्ष्येमुळे तोटा झाला. मात्र, ५ वर्षांत कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल. यावेळी कुपेकर आणि नलवडे यांनीही संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष राजेश बोरगावे, बी. एन. पाटील, रामराजे कुपेकर, संतोष पाटील-कडलगेकर उपस्थित होते.

मी पवारांपेक्षा लहानच !
वय झाल्यामुळे शिंदेंनी आता विश्रांती घ्यावी अशी चर्चा होती. त्याचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, वयाचा मुद्दा महत्त्वाचा नाही, इच्छाशक्ती आणि कामाची प्रवृत्ती हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मी शरद पवारांपेक्षा लहानच आहे. त्यांना अजूनही पंतप्रधान व्हावे, असे वाटते, तर मला पुन्हा अध्यक्ष व्हावे, असे का वाटू नये, अशी मिश्किल टिप्पणीही शिंदेंनी केली.

मुश्रीफ-शिंदेंची टोलेबाजी
मुश्रीफ यांनी भाषणात शिंदे यांना पुन्हा अध्यक्षपदी बसवू अशी घोषणा केली. त्याचा संदर्भ देत मुश्रीफांनी ‘शब्द’ पाळावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. मी दिलेला शब्द पाळणारा असल्यामुळे शिंदेंनी संशय बाळगू नये, असा खुलासा मुश्रीफांनी केला. त्यावेळी ‘मी फार भोगलोय हो’ असे शिंदे म्हणाले.
शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार
कडगाव-कौलगे - श्रीपती कदम, सयाजी देसाई. गडहिंग्लज-हनिमनाळ - बाळासाहेब मोरे, संग्रामसिंह नलवडे. भडगाव-मुगळी - अमर चव्हाण, शशिकांत चोथे, सतीश पाटील. नूल-नरेवाडी - श्रीपतराव शिंदे, बाळासाहेब मोकाशी, जब्बार मुल्ला. महागाव-हरळी - दीपक जाधव, विद्याधर गुरबे, माधव पोटे-पाटील. महिला प्रतिनिधी - निर्मला मगदूम, जयश्री पाटील. ओबीसी - बाळकृष्ण परीट. भटक्या विमुक्त जाती-जमाती - भीमराव पाटील. अनुसूूचित जाती-जमाती - सागर हिरेमठ. संस्था प्रतिनिधी - मनोहर पाटील.

Web Title: Shinde will be appointed as president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.