शौर्य, साधना, शिवानीची बाजी
By Admin | Updated: July 19, 2015 00:27 IST2015-07-19T00:24:47+5:302015-07-19T00:27:05+5:30
‘ज्युनिअर मास्टर शेफ रेसिपी स्पर्धा : ‘लोकमत’ बाल विकास मंच, सखी मंच आणि बिग बझारकडून आयोजन

शौर्य, साधना, शिवानीची बाजी
कोल्हापूर : शालेय वयातच सकस आणि पौष्टिक आहाराची सवय लागावी आणि स्वत: काही बनवून खाण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘लोकमत’ बाल विकास मंच, सखी मंच आणि बिग बझार प्रस्तुत ‘ज्युनिअर मास्टर शेफ हेल्दी टिफिन बॉक्स रेसिपी’ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शौर्य राऊत, साधना पाटील, शिवानी बनछोडे, श्रावणी उपाध्ये, सिद्धी बिडकर यांनी बाजी मारली.
विजेत्यांना बिग बझारचे स्टोअर मॅनेजर धनंजय घोंगडे, मार्केटिंग मॅनेजर धीरज पाटील, मार्केटिंग आॅफिसर अंकुश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बिग बझार येथे सखी मंच सदस्यांच्या मुलांसाठी आणि बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याठिकाणी अनेक मुलांनी आपल्या आवडीनुसार आकर्षक सजावट करून विविध पदार्थांची मांडणी केली होती. यामध्ये मटकीची भेल, पौष्टिक पोहे, आरोग्यदायी भेळ, चाट, खाकरा मसाला, ब्रेड सॅन्डविच, पौष्टीक लाडू, बटर चाट, खोबरा लाडू, पौष्टिक भेल, खजूर लाडू, बिस्किटसॅण्डविच, भाकरीचे सॅण्डविच, झटपट दहीवड्यासह अनेक पदार्थ मांडण्यात आले होते.
या स्पर्धेत ८ ते १६ या वयोगटांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाला रेसिपी तयार करण्यासाठी एक तासाचा वेळ दिला गेला होता. रेसिपी तयार करून स्पर्धक आपल्या आईच्या मदतीने या ठिकाणी पदार्थ मांडत होते. तसेच प्रत्येक पदार्थासोबत त्याची रेसिपीही या ठिकाणी लिहिली होती. पौर्णिमा होसमनी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. एकूण शंभरहून अधिक बाल विकास मंचच्या सभासदांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्व सहभागी बाल विकास मंचच्या सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सखी मंच व बाल विकास मंचच्या सदस्यांना अधिक सूट देण्याचे यावेळी बिग बझारतर्फे जाहीर करण्यात आले. येथील दर्जेदार व स्वस्त वस्तूंचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बिग बझारचे स्टोअर मॅनेजर धनंजय घोंगडे यांनी याप्रसंगी केले. यावेळी सहभागी स्पर्धकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्यांना बिग बझारतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ( प्रतिनिधी )