शाहू समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:26 IST2020-02-29T17:25:21+5:302020-02-29T17:26:57+5:30
नर्सरीबाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन राजर्षी शाहू सेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आले.

कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे, या मागणीचे निवेदन शुक्रवारी राजर्षी शाहू सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
कोल्हापूर : नर्सरीबाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन राजर्षी शाहू सेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आले.
अध्यक्ष शुभम शिरहट्टी व कार्याध्यक्ष संजय पोवार-वाईकर, प्रसाद जाधव यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधिस्थळाला ‘राजघाट’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी परिसराला ‘चैत्यभूमी’, जवाहरलाल नेहरू यांच्या समाधिस्थळाला ‘विजयघाट’, इंदिरा गांधी यांच्या समाधिस्थळाला ‘शक्तिस्थळ’, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळ परिसराला ‘प्रीतिसंगम’ संबोधले जाते.
त्याप्रमाणे समतेचे राज्य निर्माण करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे ‘समतास्थळ’ असे नामकरण करण्यात यावे. त्याचबरोबर नर्सरीबाग परिसरात सुसज्ज वीज व्यवस्था करावी, समाधिस्थळ परिसरात चोवीस तास सुरक्षारक्षक नेमावा.
शिष्टमंडळात पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, शुभम वाशीकर, लहुजी शिंदे, चंदा बेलेकर, प्रकाश सरनाईक, विनोद माने, वैभव कांबळे, संतोष पोवार, आेंकार माजगावकर, आदींचा समावेश होता.