नर्सरी बागेत शाहू महाराजांची समाधी
By Admin | Updated: April 10, 2015 00:31 IST2015-04-10T00:12:27+5:302015-04-10T00:31:47+5:30
महापालिकेचा निर्णय : अखेर समाधीची इच्छा पूर्ण होणार; पहिल्या टप्प्यात होणार ६७ लाख खर्च

नर्सरी बागेत शाहू महाराजांची समाधी
कोल्हापूर : समाजोद्धाराचे कार्य करणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची समाधीची अखेरची इच्छा आता पूर्ण होणार आहे. ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी शककर्ते शिवाजी महाराज, ताराराणी यांची मंदिरे निर्माण केली, त्याच नर्सरी बागेत महापालिकेच्यावतीने पहिल्या टप्प्यात ६७ लाख रुपये खर्चून शाहू महाराजांचे समाधिस्थळ विकसित करण्यात येणार आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईची फळे आजही कोल्हापूरला मिळत असली तरी महाराजांची कोल्हापुरात समाधी नाही. कसबा बावडा परिसरातील शाहू जन्मस्थळाचे काम रडतखडत आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. राजर्षी शाहू महाराजांनी नर्सरी बागेत नितांत श्रद्धेतून शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांचे मंदिर बांधले. शिवाजी महाराजांच्या मंदिरामागे छत्रपती घराण्यातील राजे व महाराणीसाहेबांच्या, अगदी राजर्षी शाहू महाराजांच्याही आई-वडिलांचीही समाधी मंदिरे आहेत; पण आज त्यांची अवस्था न सांगण्यासारखी आहे. शाहू महाराजांचे मुंबईतील ‘पन्हाळा लॉज’ या बंगल्यात ६ मे १९२२ रोजी निधन झाले. तत्पूर्वी, त्यांनी माझ्या मृत्यूनंतरही रघुनाथ पंडित महाराज व माझी ताटातूट होऊ नये यासाठी पंचगंगा घाटावर असलेल्या रघुनाथ पंडित महाराज यांच्या समाधिमंदिराशेजारी माझे समाधिमंदिर व्हावे, या आशयाचे पत्र लिहून ठेवले होते. मात्र त्यावेळी ते शक्य झाले नाही; पण महाराजांच्या निधनानंतर त्याच वर्षी महाराजांनी सत्यशोधक टी स्टॉल ज्यांना उघडून दिला, त्या गंगाराम कांबळे व सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांनी मिळून नर्सरी बागेत शाहू महाराजांची समाधी बांधली. तिची छायाचित्रे आणि कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत.
या समाधिस्थळाच्या परिसरात राजाराम महाराजांच्या काळात शालिनी क्लबची स्थापना झाली. येथे टेबल टेनिस खेळले जात असे. या खेळात समाधीचा अडथळा होऊ लागला म्हणून ती समाधीच तेथून काढून टाकण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराजांची समाधीच नव्हती. तीन-चार वर्षांपूर्वी शाहू महाराजांची समाधी पूर्वी ज्या परिसरात होती, तेथेच ती पुन्हा उभारण्याचा विचार पुढे आला.
या जागेवर महापालिकेने ग्रीन झोनचे आरक्षण टाकले होते; पण शाहू महाराजांच्या समाधीचा विषय मांडल्यानंतर हे ग्रीन झोनचे आरक्षण उठवून त्यावर समाधिस्थळाचे आरक्षण टाकण्यात आले. महापालिकेच्या सभेत राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचा ठराव करून तो शासनाला पाठविण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात त्याची टेंडर प्रक्रियाही सुरू होईल, असे अधिकृत सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
४८ फूट उंचीची समाधी साकारणार
नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणींचे मंदिर हा परिसर छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल व मैदान हा परिसर महापालिकेच्या ताब्यात आहे; पण महापालिकेने या पूर्ण परिसराचा विकास आराखडा बनविला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च चार ते पाच कोटींपर्यंत अपेक्षित आहे. यामध्ये बगीचा, आंबेडकर हॉलची पुनर्बांधणी यांचा समावेश आहे. महापालिकेने आता समाधिस्थळासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या ठिकाणी काळ्या पाषणात शाहू महाराजांची ४८ फूट उंचीची समाधी बांधण्यात येणार आहे. त्यावर छत्री असेल. समाधीच्या चारीही बाजूंना रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीप्रमाणे शिल्प उभारण्यात येणार आहे. यावर छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी केलेली वक्तव्ये कोरण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात महाराजांच्या इच्छेनुसार येथेच रघुनाथ पंडित महाराज यांचीही समाधी उभारण्यात येणार आहे.
आपली समाधी रघुनाथ पंडित यांच्या समाधीच्या शेजारी असावी, असे पत्र शाहू महाराजांनी लिहून ठेवले आहे; पण कोल्हापुरात त्यांची समाधीच नव्हती. आता महापालिकेने समाधी बांधण्याचा निर्णय घेतल्याने शाहू महाराजांची इच्छा पूर्ण होईल. - इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक