'कोल्हापूर'साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित, आज घोषणा शक्य  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:43 PM2024-03-06T13:43:28+5:302024-03-06T13:44:40+5:30

'महाविकास'च्या बैठकीत 'ठरलं'

Shahu Chhatrapati candidate from Congress for Kolhapur Lok Sabha, announcement possible today | 'कोल्हापूर'साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित, आज घोषणा शक्य  

'कोल्हापूर'साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित, आज घोषणा शक्य  

कोल्हापूर : काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोघांनाही हवा असलेला कोल्हापूरलोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देत तेथून शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज बुधवारी होणाऱ्या महाविकासच्या बैठकीत शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याचे समजते.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेनेची शकले झाल्यानंतर या मतदारसंघावर दावा सांगत काँग्रेसने शाहू छत्रपती यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, आपला पारंपरिक मतदारसंघ सहजासहजी काँग्रेसला सोडायला शिवसेना तयार नव्हती. या एकाच जागेवरून गेल्या आठवड्यापासून दोन्ही पक्षांत अंतर्गत जोरदार घमासान सुरू असताना सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यात प्रामुख्याने कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा झाली. या बैठकीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्याबाबत शिवसेनेने सहमती दर्शविली असल्याचे कळते. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे.

दोन नव्हे, एकच जागा

कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ पूर्वी भाजप- शिवसेना युतीत सेनेकडे होते. भाजपपासून काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही मतदारसंघ लढविण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, शिवसेनेने यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ माजी खासदार राजू शेट्टी यांना सोडत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा अधिक घट्ट केला होता. या जागेवर काँग्रेसने दावा ठोकताच पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा लढवायला आमच्याकडे एकही जागा उरत नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे होते.

मात्र, हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे. त्यांच्या कोट्यातून त्यांनी ती राजू शेट्टी यांना दिल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे आहे, हवे तर त्यांनी ती लढवावी, असे सुचवत कोल्हापूरच्या दोन्ही जागा आमच्याकडे नाहीत, असे शिवसेना कशी काय म्हणू शकते? अशी मांडणी काँग्रेसने केली.

Web Title: Shahu Chhatrapati candidate from Congress for Kolhapur Lok Sabha, announcement possible today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.