इचलकरंजी : येथील शहापूर पोलिसांनी मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या विक्री प्रकरणी कोरोची (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाला अटक केली. ऋषभ राजू खरात (वय ३०, रा. लोकमान्यनगर, कोरोची) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ७० हजार २०० रुपये किंमतीचा १३४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ, रोख रक्कम व अन्य साहित्य असा ६ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस अधिक्षक यांच्या आदेशानुसार मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम सुरु आहे. या अनुषंगाने तपास सुरु असताना शहापूर पोलिस ठाण्याकडील पोलिस कॉन्स्टेबल सतिश कुंभार यांना कोरोची गावच्या हद्दीत एक व्यक्ती मेफेड्रॉन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळली.
त्यानुसार शहापूर पोलिसांनी पंचगंगा कारखाना ते कोरोची या मार्गावर सापळा रचला. मिळालेल्या माहितीवरुन ऋषभ खरात याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ६ लाख ७३ हजार रुपयांचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करत १३४ ग्रॅम वजनाचा चॉकलेटी, फिक्कट गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या अशा विविध रंगातील मेफेड्रॉन अंमली पदार्थ, सॅक, प्लास्टिकचा बॉक्स, वजन काटा व अन्य साहित्य असा ६ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई शहापूरचे पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी, पोलिस उपनिरिक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, रोहित डावाळे, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे यांच्या पथकाने केली.