ग्रहणामुळे प्रसूती करण्यास सेविकेचा नकार
By Admin | Updated: April 7, 2015 01:18 IST2015-04-06T23:48:08+5:302015-04-07T01:18:09+5:30
कोकिसरे आरोग्य केंद्रातील प्रकार : अवघडलेल्या गर्भवतीचा वेदनादायी प्रवास

ग्रहणामुळे प्रसूती करण्यास सेविकेचा नकार
पाटण : एकीकडे प्रसूतीच्या असह्य वेदनेने महिला तडफडत असताना एका आरोग्य सेविकेने चंद्रग्रहण असल्यामुळे प्रसूती न करण्याचा अजब प्रकार पाटण तालुक्यातील कोकिसरे येथील आरोग्य उपकेंद्रात घडला. या प्रकारामुळे अवघडलेल्या गर्भवतीची अक्षरश: ससेहोलपट झाली. मोरगिरी, पाटण याठिकाणीही दखल न घेतल्यामुळे नातवाइकांनी एक तासाचा प्रवास करत कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल केले.
कोकिसरे आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेविकेने केलेल्या या प्रकाराबाबत ग्रामस्थांसह पंचायत समितीच्या सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत माहिती अशी, शनिवारचा दिवस होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोकिसरे (कुंभारवाडी) येथील महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला नजीकच्या आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले.
मात्र, ‘आज चंद्रग्रहण आहे, त्यामुळे मी प्रसूती करणार नाही,’ असा निर्णय आरोग्य सेविकेने घेतल्यामुळे अवघडलेल्या महिलेसह नातेवाइकही संकटात सापडले. (प्रतिनिधी)
तीन दिवस उलटूनही कारवाई नाही
कोकिसरे आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविकेने प्रसूती करण्यास नकार दिल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मोरगिरी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य सेविकेवर कारवाई करा, असे पत्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार यांनीही कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई संबंधित आरोग्य सेविकेवर झालेली नाही, याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
मोरगिरी रुग्णालयातही नाही घेतली दखल
आरोग्य सेविकेने प्रसूती करण्यास नकार दिल्यामुळे वेदनेने तडफडत असणाऱ्या महिलेस मोरगिरी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेही डॉक्टर नाहीत, आरोग्य सेविका नाहीत, अशी अवस्था होती. प्रसूतीच्या वेदनेने ती महिला ओरडत होती. तिच्या आवाजाने रुग्णालयात लोक जमा झाले. मात्र करायचे काय? डॉक्टर नाहीत. आरोग्य सेविका दवाखान्यात यायला तयार होईना. यामुळे नातेवाइकांपुढे काय करावे, याचा पेच पडलेला.
१०८ नंबरचा आधार
मोरगिरी आरोग्य केंद्रातही दखल घेतली न गेल्यामुळे नातेवाइकांनी १०८ नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलाविली. डॉक्टरही आले; पण मोरगिरी रुग्णालयात सेविका व इतर सोयी नसल्यामुळे गर्भवतीला पाटण ग्रामीण रुग्णालयात हलविले.
ग्रहण असल्यामुळे प्रसूती न करणे म्हणजे अजब प्रकार आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने आपल्या भोंगळ कारभाराची सीमा पार केली आहे. आमदार शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून संबंधित आरोग्य सेविकेवर कारवाई करावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.
- नथुराम कुंभार,
सदस्य, पंचायत समिती पाटण
कोकिसरे आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका पी. एस. जाधव यांनी ग्रहणाचे कारण सांगून प्रसूती न करण्याचा घेतलेला निर्णय ही गंभीर बाब आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करणार आहे.
- डॉ. दीपक साळुंखे,
तालुका वैद्यकीय अधिकारी, पाटण