‘धर्मादाय’च्या प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा
By Admin | Updated: July 16, 2015 00:56 IST2015-07-16T00:56:30+5:302015-07-16T00:56:30+5:30
आॅगस्टपासून विशेष मोहीम : २० वर्षांहून अधिक काळातील कामांचा निर्णय

‘धर्मादाय’च्या प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा
प्रवीण देसाई- कोल्हापूर -गेल्या २० वर्षांहून अधिक काळ धर्मादाय आयुक्त कार्यालयातील जवळपास हजारो प्रकरणे निपटाऱ्याविना प्रलंबित आहेत. विश्वस्त बदल, घटना व नियमावली दुरुस्ती अशा स्वरूपाची ही प्रकरणे आहेत. संबंधित संस्थांचे प्रतिनिधीच इकडे न फिरकल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर काही तरी निर्णय घेऊन ती निकालात काढण्यासाठी या कार्यालयातर्फे आॅगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालय (सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय) येथे वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, मंदिर, आदींच्या ट्रस्टसह सार्वजनिक मंडळे, गणेशोत्सव मंडळे, सार्वजनिक वाचनालये यांची नोंदणी केली जाते. यांच्या नोंदणीसाठी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार मंदिरांच्या ट्रस्टची नोंदणी ‘ए’ गटात, शैक्षणिक ट्रस्ट, सामाजिक ट्रस्ट, सार्वजनिक वाचनालये, सार्वजनिक मंडळे, गणेशोत्सव मंडळे, आदींची नोंदणी ‘एफ’ गटात, तर वैयक्तिक चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी ‘ई’ गटात होते. तसेच चर्चची नोंदणी ही ‘डी’ गटात होते. या स्वरूपाच्या संस्थांची संख्या जिल्ह्यात सुमारे ४० हजार आहे.
या कार्यालयाकडे ट्रस्टचा विश्वस्त बदल अर्ज, मिळकत नोंदी अर्ज, घटना व नियमावली दुरुस्ती अर्ज, आदी स्वरूपाची हजारो प्रकरणे गेल्या २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. एकदा नोंदणी केल्यानंतर पुढची जबाबदारी ही या कार्यालयाचीच असते, या मानसिकतेतून कुणी इकडे फिरकल्याचेच दिसत नाही. त्यामुळे मूळ प्रकरणे कमी होण्याऐवजी यात भरच पडत गेली आहे. या संदर्भात माहिती घेण्यासाठी व आपल्या प्रकरणाचे पुढे काय झाले? हे विचारायला कोणी इकडे न आल्याने प्रकरणांच्या कागदांचे ढीग पडले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रलंबित प्रकरणांचे करायचे काय? असा प्रश्न या कार्यालयाला भेडसावत आहे. त्याचबरोबर प्रकरणे प्रलंबित राहण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे या कार्यालयातील कमी मनुष्यबळ. या ठिकाणी पूर्वी एक धर्मादाय सहआयुक्त व धर्मादाय उपायुक्त अशी दोनच पदे होती. परंतु, या वर्षभरात या पदांमध्ये वाढ होऊन एक धर्मादाय सहआयुक्तासह एक उपायुक्त व तीन सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ही प्रकरणे निकालात निघणार आहे.
त्यासाठी आॅगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकालात काढली जाणार आहेत. बहुसंख्य संस्थांचे विश्वस्त, तसेच पदाधिकाऱ्यांना नोंदणी नंतरची प्रक्रिया माहिती नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या मोहिमेंतर्गत जाणीव जागृतीही केली जाणार आहे. ही प्रकरणे पूर्णपणे निकाली निघेपर्यंत मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.
‘धर्मादाय’मध्ये मोहीम
धर्मादाय आयुक्त कार्यालय बागल चौक येथे ही मोहीम सुरू होणार आहे. तरी संबंधितांनी न्यासाचे नोटीस रजिस्टर, प्रोसिडिंग रजिस्टर घेऊन कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन कोल्हापूर विभागाचे धर्मादाय सहआयुक्त एन. एस. पवार यांनी केले आहे.
शैक्षणिक ट्रस्टची जागरूकता
या कार्यालयाकडील शैक्षणिक ट्रस्टमध्ये थोडी जागरूकता असल्याचे दिसत आहे. कारण या ट्रस्टना मिळणाऱ्या सरकारी अनुदानासाठी विश्वस्त बदल, मिळकत नोंदणी अर्ज, घटना व नियमावली दुरुस्ती, आदी माहिती वरचेवर द्यावी लागते. त्यामुळे या ट्रस्टना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे यावे लागते.