मृतांच्या दाखल्यावर तोडगा काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:17+5:302020-12-05T04:58:17+5:30
काेल्हापूर : मृतांच्या दाखल्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल्याची मागणी केल्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन केल्याशिवाय दाखला दिला जात ...

मृतांच्या दाखल्यावर तोडगा काढा
काेल्हापूर : मृतांच्या दाखल्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल्याची मागणी केल्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन केल्याशिवाय दाखला दिला जात नाही. यावर सर्वमान्य तोडगा काढा. प्रत्येक प्रभागासाठी एका डॉक्टराची नियुक्ती करा, अशी मागणी शुक्रवारी महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन केली. याचबरोबर शहरातील रस्ते खराब झाले असून नवीन रस्त्यांची कामे मंजूर असणाऱ्या ६० कोटींच्या निधीतून तत्काळ सुरू करा, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, काही डॉक्टर तपासणीसाठी मृतदेह दवाखान्यात घेऊन आणण्याची सक्ती करतात. असे न होता डॉक्टरांनी घरी जाऊन तपासणी करून दाखला दिला पाहिजे. याबाबत प्रशासनाने स्पष्ट आदेश द्यावेत. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक अर्जुन माने, विनायक फाळके, भूपाल शेटे, प्रकाश गवंडी, अशपाक आजरेकर, मॉन्टी मगदूम उपस्थित होते.
चौकट
६० कोटींची मंजूर रस्त्यांची कामे सुरू करा.
शहरातील खराब रस्त्यांसाठी राज्य शासन आणि महापालिकेकडून ६० कोटींचा निधी उपलब्ध आहे. ज्या ठिकाणचे रस्ते या निधीतून मंजूर आहेत, त्यांची कामे सुरू करावीत. शहरात चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत असून तातडीने उपाययोजना करा, असे माजी महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या.
चॅनेलची कामे सुरू करा
महापालिकेच्या बजेटमधील २०१९-२० मधील मंजूर कामे प्राधान्यक्रमानुसार करा. १० प्रभागांत चॅनेल नसल्यामुळे नागरिकांच्या घरांत सांडपाणी शिरत आहे. यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला असून, ही कामे सुरू करा. शहरातील खराब झालेले रस्ते तत्काळ करा, अशी सूचना राहुल माने यांनी केली.
माजी पदाधिकाऱ्यांच्या मागण्या
महापूर आणि कोरोनामध्ये बाधित झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांना घरफाळा दंड, पाणीपट्टीत सवलत द्या.
बंद असणारे एलईडी सुरू करा
रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायम करा.
अमृत योजनेच्या सर्व्हेतून काही कामांचा समावेश झालेला नाही. तेथे शिल्लक राहणाऱ्या पाईपलाईन टाका.
झोपडपट्टीतील नागरिकांना थकीत पाणीपट्टीत सवलत द्या.
फोटो : ०४१२२०२० कोल केएमसी पदाधिकारी बैठक
ओळी : कोल्हापूर महापालिकेचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी शुक्रवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली.