जेष्ठ रणजी क्रिकेटपटू ध्रुव केळवकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:51 IST2020-08-12T16:00:21+5:302020-08-12T16:51:17+5:30
जेष्ठ रणजी क्रिकेटपटू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सहसचिव ध्रुव केळवकर (वय ५३ ) यांचे बुधवारी सकाळी ताराबाई पार्क येथील घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

जेष्ठ रणजी क्रिकेटपटू ध्रुव केळवकर यांचे निधन
कोल्हापूर : ज्येष्ठ रणजी क्रिकेटपटू व काेल्हापूर जिल्हा क्रिकेट असाेसिएशनचे सहसचिव ध्रुव प्रभाकर केळवकर (वय ५३ ) यांचे बुधवारी सकाळी ताराबाई पार्क येथील घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, बंधू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मितभाषी, गुरुतुल्य, निगर्वी, अष्टपैलू खेळाडू हरपल्याची भावना क्रिकेट वर्तुळातून व्यक्त झाली. केळवकर मेडिकल सेंटरचे डॉ. प्रल्हाद केळवकर यांचे ते धाकटे बंधू होत.
ध्रुव यांना शालेय जीवनापासून क्रिकेटची आवड होती. सेंट झेव्हिअर्स हायस्कूल व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सकडून शिवाजी विद्यापीठाच्या संघातून त्यांनी राज्य व राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा गाजविल्या. स्थानिक क्रिकेट स्पर्धेतून त्यांची सन १९८९-९० साली महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली. केळवकर डावखुरे गोलंदाज होते. जसदनवाला करंडक, विल्स ट्रॉफी, आदी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी गाेलंदाजीची छाप पाडली.
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे महाराष्ट्र विरुद्ध विल्स क्रिकेट संघ यांच्यातील सामन्यांत त्यांनी महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व केले. क्लब क्रिकेट खेळणे बंद केल्यानंतर ते नवाेदित खेळाडू घडविण्यासाठी सागरी जिमखान्यावर कष्ट घेत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरातील अनेक क्रिकेटपटूंनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवली. खेळासाेबत त्यांना खेळपट्टी कशी तयार करायची याचेही ज्ञान हाेते. त्यामुळे ते एक उत्तम क्युरेटर म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या निधनाचा नवोदितांसह समकालीन क्रिकेटपटूंनाही धक्का बसला.