ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. बी. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:18+5:302021-05-01T04:23:18+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शामराव भाऊसो उर्फ एस. बी. पाटील शिरोळकर (वय ...

Senior Jurist Adv. S. B. Patil passed away | ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. बी. पाटील यांचे निधन

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. बी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शामराव भाऊसो उर्फ एस. बी. पाटील शिरोळकर (वय ८५, रा. शिवाजी पेठ ) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ॲड. शिवराज पाटील, धैर्यशील पाटील आणि डॉक्टर वीरधवल पाटील यांचे ते वडील होत. मूळचे शिरोळ येथील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या ॲड. पाटील यांनी कष्टातून कायद्याची पदवी संपादन केली होती. कोल्हापुरात प्रॅक्टिस करताना दिवाणी दाव्यातील तज्ज्ञ वकील म्हणून लौकिक संपादन केला. महसूल न्यायाधीकरणाकडे चालणाऱ्या कामांमध्ये त्यांचा हातखंडा होता. अनेक मोठे खटले त्यांनी हाताळले होते.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव आदी पदे त्यांनी भूषविली. कोल्हापूर सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीचे ते मार्गदर्शक ही होते. युवा वकिलांना ते मार्गदर्शन करीत असत. विरोधी पक्षकाराच्या वकिलांनाही प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत अभ्यासू असणाऱ्या पाटील यांनी शेवटपर्यंत वकिलीची नाळ तुटू दिली नाही. प्रॅक्टिस सुरू ठेवली होती. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या न्यायालयीन जगतातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त झाली. निधनावर कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड विवेक घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड रणजीत गावडे यांच्यासह सर्व वकिलांनी शोक व्यक्त केला.

फोटो: ३००४२०२१-कोल-ॲड. एस.बी.पाटील निधन

Web Title: Senior Jurist Adv. S. B. Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.