एटीएममधील १० हजारसाठी ज्येष्ठ नागरिकाचे हेलपाटे; दोन बँकांचा मुर्दाडपणा : बँकेत जमा केलेले पैसे मिळण्यात अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:45+5:302020-12-15T04:40:45+5:30
कोल्हापूर : एटीएममधून काढण्यात आलेले, परंतु प्रत्यक्षात न मिळालेले दहा हजार रुपये मिळविण्यासाठी एका सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ ...

एटीएममधील १० हजारसाठी ज्येष्ठ नागरिकाचे हेलपाटे; दोन बँकांचा मुर्दाडपणा : बँकेत जमा केलेले पैसे मिळण्यात अडचण
कोल्हापूर : एटीएममधून काढण्यात आलेले, परंतु प्रत्यक्षात न मिळालेले दहा हजार रुपये मिळविण्यासाठी एका सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची गेली सहा महिने ससेहोलपट सुरू आहे. बँक ऑफ इंडिया व स्टेट बँकेने एकमेकांकडे बोट दाखवून त्यांचा अक्षरश: चेंडू केला आहे. हे पैसे मिळविण्यासाठी आता नक्की काय करायला पाहिजे हेच त्यांना सुचेना झाले आहे. एटीएमवरून त्यांच्या खात्यावरून निघालेले पैसे सचिन दीपक लोंढे या तरुणाने प्रामाणिकपणे बँकेत जमा केले आहेत, परंतु ते ज्यांचे पैसे आहेत त्यांना मात्र मिळायला तयार नाहीत. २० मेपासून हा घोळ सुरू आहे.
घडले ते असे : पोवार कॉलनीमध्ये राहणारे व पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेले किरण बापूसाहेब ढेंगे हे २० मे रोजी पाचगाव पोवार कॉलनीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर सकाळी ९.२० मिनिटांनी गेले. त्यांचे स्टेट बँकेच्या बाबा जरगनगर शाखेत पेन्शन खाते आहे. एटीएमवरून त्यांनी १० हजार रुपये काढले, परंतु मशीन स्लो असल्याने पैसे आले नाहीत म्हणून काही क्षण ते वाट पाहून निघून गेले. पुढच्या दहा मिनिटांत तिथे सचिन दीपक लोंढे हा तरुण गेल्यावर त्याला कॅश ट्रे मध्ये ५०० च्या नव्या कोऱ्या नोटा बाहेर आलेल्या दिसल्या. एखाद्या गरजूची हक्काची रक्कम हाती पडल्यानंतर सचिनने ती परत करण्याचा निर्णय घेतला व दहा हजार रुपये आणि एटीएममधून आलेली स्लिप बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर मुख्य शाखेत जमा केली. दुसऱ्या दिवशी त्याने ही पोस्ट आम्ही कोल्हापुरी ग्रुपवर शेअर केली.
ही पोस्ट वाचल्यानंतर ढेंगे यांचे नातेवाईक संतोष कुईगडे यांनी सचिनशी संपर्क साधला. बँकेत जाऊन योग्य ती कागदपत्रे दाखवून ती रक्कम ताब्यात घ्यायची असे ठरविले. त्यानंतर गेले सहा महिने ते पैसे मिळावेत यासाठी बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेत हेलपाटे मारत आहेत. त्यांना झोनल ऑफिसमध्ये चौकशी करण्यास सांगितले. तिथे मिळालेली वागणूक ही इतकी वाईट होती की, क्षणभर असे वाटले की आपण एटीएम सेंटरमधून चोरी केली आहे की काय..? पैसे एटीएममधून निघाले आहेत, ग्राहकाला मात्र मिळालेले नाहीत. मिळालेले पैसे बँकेत जमाही झाले आहेत, परंतु बँकेने ते रिकन्सिलियशन खात्यात जमा केले आहेत आणि ज्येष्ठ नागरिक पैसे द्या म्हणून हेलपाटे मारत आहेत अशी सद्य:स्थिती आहे. दोन्ही बँकांतील कुणीतरी माणुसकी दाखवून योग्य ती खातरजमा करून हे पैसे त्यांना परत देण्यासाठी मदत करण्याची गरज आहे.
(विश्वास पाटील)