सांगली, रत्नागिरी उपांत्य फेरीत

By Admin | Updated: March 12, 2015 00:09 IST2015-03-11T22:36:10+5:302015-03-12T00:09:00+5:30

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा: मुंबई शहर, पुणे यांचाही समावेश

In the semi-finals of Sangli, Ratnagiri | सांगली, रत्नागिरी उपांत्य फेरीत

सांगली, रत्नागिरी उपांत्य फेरीत

पुरळ (ता.देवगड) : मुंबई शहर, पुणे, सांगली, रत्नागिरी यांनी पुरुषांच्या कबड्डी सामन्यात तर मुंबई शहर, पुणे, मुंबई उपनगर, रत्नागिरी यांनी महिलांच्या कबड्डी सामन्यात १७ व्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.
मुंबई शहर विरुद्ध पुणे, सांगली विरूद्ध रत्नागिरी अशा पुरुषांच्या कबड्डी सामन्यात तर मुंबई शहर विरूद्ध पुणे, मुंबई उपनगर विरुद्ध रत्नागिरी अशा महिलांच्या सामन्यात उपांत्य लढती होणार आहेत. रत्नागिरीच्या सतीश खांबेने एकाच चढाईत ४ गडी बाद केल्याने त्यांचा विजय सोपा झाला.महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या यजमानपदाखाली जामसंडे सन्मित्र मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
जामसंडे-देवगड येथील विद्याविकास शाळेच्या पटांगणावर सुरु असलेल्या महिलांच्या उपउपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने कोल्हापूरचा प्रतिकार २३-१५ असा संपुष्टात आणला. सावध खेळ करीत उपनगरने कोल्हापूरवर लोन चढविला व मध्यंतराला १४-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर आहे ती आघाडी टिकविण्यावर भर देत गुणास गुण वसूल करीत मध्यंतरातील आघाडीवर म्हणजेच ८ गुणांनी सामना खिशात टाकला. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी ९-९ गुणांची कमाई केली. अश्विनी शेवाळे, कोमल देवकरच्या चढाया त्याला तेजस्वी पवार, पायल पवार यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय साकारला. कोल्हापूरच्या अरुणा सावंत, शुभदा मानेने मध्यंतरानंतर छान लढत दिली.
रत्नागिरी विरूद्ध नागपूर हा सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. विजयाचे पारडे सतत दोन्ही बाजूला झुकत होते. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर रत्नागिरीने नागपूरला २२-२१ असे चकवित उपांत्यफेरी गाठली. मध्यंतराला १७-१० अशी मोठी आघाडी रत्नागिरीकडे होती. यावरून रत्नागिरी हा सामना सहज जिंकणार असे वाटत होते. परंतु नागपूरच्या पिंकी बान्त, माधवी वानखेडेने उत्तरार्धात जोशपूर्ण खेळ करीत सामना संपायला १ मिनिट असताना २१-२० अशी आघाडी नागपूरला गाठून दिली. परंतु रत्नागिरीने चढाईत गुण घेत श्रद्धा पवारला जीवदान दिले. त्याचा लाभ घेत तिने सामन्याच्या शेवटच्या चढाईत गडी टिपत सामना रत्नागिरीकडे झुकविला.
पुरुषांच्या उपउपांत्य सामन्यात रत्नागिरीने मुंबई उपनगरचे कडवे आव्हान २५-१० असे परतविले. मध्यंतराला ५-४ अशी रत्नागिरीकडे आघाडी होती. परंतु मध्यंतरानंतर आठव्या मिनिटाला २ गुण घेत उपनगरने ६-४ अशी आघाडी घेतली. परंतु रत्नागिरीच्या सतीश खांबेच्या एका फसव्या चढाईला उपनगरचे ४ खेळाडू फसले. सतीश खांबेला प्रदीप शिंदे, स्वप्नील शिंदे व भूषण कुळकर्णीने साथ दिली.
सांगलीने रायगडला १७-९ असे नमवित उपांत्यफेरी गाठली. मध्यंतरापर्यंत ५-४ अशी सांगलीकडे आघाडी होती. नंतर मात्र उत्तरार्धात रायगडवर लोन देत त्यांनी आघाडी वाढविली व ८ गुणांनी सामना जिंकला. सांगलीकडून अनिल वडार, अमोल माळी, सुहास वगरे, धनंजय अवटी तर रायगडचे अनिकेत पाटील, अनिकेत कोठेकर चमकले. (वार्ताहर)

Web Title: In the semi-finals of Sangli, Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.