धनंजय महाडिक यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच भीमा कारखान्यावर जप्ती; श्रीरामचे सभापती गोडसे यांची टीका : संस्था मोडण्याचीच प्रवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:40+5:302021-03-24T04:23:40+5:30
कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यातील भ्रष्ट कारभारामुळेच ऑनलाइन सभेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस माजी ...

धनंजय महाडिक यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच भीमा कारखान्यावर जप्ती; श्रीरामचे सभापती गोडसे यांची टीका : संस्था मोडण्याचीच प्रवृत्ती
कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यातील भ्रष्ट कारभारामुळेच ऑनलाइन सभेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दाखवले नाही. असाच भ्रष्ट कारभार पंढरपूरच्या भीमा कारखान्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केल्यामुळेच २८ कोटी ४४ लाख रुपयांच्या थकीत ऊसबिलापोटी कारखान्यावर जप्तीच्या कारवाईचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. त्यातून संस्था काढण्यापेक्षा त्या मोडण्याची महाडिकांची प्रवृत्ती दिसून येत असल्याची टीका कसबा बावडा श्रीराम सेवा संस्थेचे सभापती धनाजी गोडसे, संचालक राजीव चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राजाराम कारखान्याच्या ऑनलाइन सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता सभा गुंडाळली. भ्रष्ट कारभाराचा पोलखोल होणार असल्याने महाडिक यांनी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पंढरपूरच्या भीमा कारखान्यामध्ये सुद्धा शेतकरीविरोधात कारभार केला आहे. कारखान्याने शेतकरी, वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांची तब्बल ६४ कोटींची देणी दिलेली नाहीत. सन २०२०-२१ मधील काळात गाळप केलेल्या उसाची २८ कोटी ४४ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस याची विक्री करून तसेच आवश्यकता भासल्यास या कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी, असे आदेशात म्हटले आहे.