रात्रपाळीसाठी महिलांना हवी सुरक्षेची हमी

By Admin | Updated: May 22, 2015 00:39 IST2015-05-22T00:38:26+5:302015-05-22T00:39:22+5:30

सध्या परिचारिका, महिला पोलिसांना रात्रपाळी : कोल्हापूर परिक्षेत्रातील ११ हजार २३० महिलांना लाभ होणार

Security for women needs for night-time | रात्रपाळीसाठी महिलांना हवी सुरक्षेची हमी

रात्रपाळीसाठी महिलांना हवी सुरक्षेची हमी

कोल्हापूर : आम्ही ज्या संस्थेत काम करतो, तिथे नेहमी ‘तुम्हाला काय रात्रपाळी नाही...’ अशा शब्दांत सुनावले जाते. त्या बदल्यात वाढीव कामे आणि पुरुषांपेक्षा कमी पगार हा अन्याय सहन करावा लागतो. महिलांनी रात्रपाळी करायला काहीच हरकत नाही; पण आमच्या सुरक्षिततेची हमी घेतली गेली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे, अशा प्रतिक्रिया युवतींनी व्यक्त केल्या. शासनाने महिलांना रात्रपाळी करण्याची मुभा दिल्याने कोल्हापूर परिक्षेत्रातील ११ हजार २३० महिलांना याचा लाभ होणार आहे.
कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. २०) घेतला आहे. त्यानुसार आता महिला कामगारांनाही सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांना रात्रपाळी करता येणार आहे. या सवलतीमुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील जवळपास ११ हजार २३० महिलांना याचा लाभ घेता येईल.
सध्या फक्त परिचारिका आणि महिला पोलिसांनाच रात्रपाळीची ड्यूटी दिली जाते. तो त्यांच्या कामाचाच एक भाग असतो. मात्र यापुढे ज्या-ज्या कारखान्यांमध्ये किंवा आस्थापनांमध्ये महिला कामगार असतील, त्या सर्वांना रात्रपाळी करता येईल. आजवर कोठेही महिलांना रात्रपाळी दिली जात नसल्याने ज्या कारखान्यात दिवसा महिला कामगार आहेत, तेथे कामगार आयुक्त कार्यालयातर्फे तपासणी केली जाते. प्रश्न असतील तर ते सोडविले जातात.


परिचारिकांचे प्रश्न
महिला कामगारांना आता रात्रपाळीची मुभा दिली असली तरी परिचारिका (नर्सेस) आणि महिला पोलिसांच्या नोकरीतच रात्रपाळीची अट असल्याने त्या वर्षानुवर्षे आपली ड्यूटी नेटाने बजावतात. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मध्यरात्री एखादा रुग्ण दाखल होतो. काहीवेळा रुग्णांचे नातेवाईक दारू पिऊन आलेले असतात. काही प्रश्न निर्माण झाले की गोंधळ घातला जातो. महिलांवर दबाव आणला जातो.


महिला पोलिसांचे प्रश्न
महिला पोलिसांना सुरक्षिततेचा प्रश्न नसला तरी सोयी-सुविधा नसल्याने प्रचंड कुचंबणा होते. कोल्हापुरातील रेल्वे स्थानकानजीकच्या तसेच जिल्ह्यातील बऱ्याच पोलीस ठाण्यांमध्ये स्वच्छतागृहांची सोय नाही. अशा वेळी या महिलांना चालत जाऊन अशी काही सोय आहे का, पाहावे लागते. अंबाबाई मंदिराबाहेर चारीही दरवाजांवर दोन-दोन महिला पोलीस असतात. रात्री मंदिराचे दरवाजे बंद असल्याने आतील स्वच्छतागृहात जाता येत नाही. अशावेळी तेथील रहिवाशांना किंवा हॉटेल, यात्री निवासधारकांना त्यांना विनंती करावी लागते.


कारवाईचा ससेमिरा
महिला पोलीस म्हणून रात्री काम करताना आम्हाला पाणी, स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सोयी-सुविधादेखील उपलब्ध नसतात. पर्यायी सोय कुठे होतेय का हे पाहण्यासाठी गेलो तर तेवढ्यात पॉइंटवर हजर नसल्याचे कारण सांगून कारवाई केली जाते. सध्या पोलीस दलामध्ये अनेक नवीन मुलींना सहकाऱ्यांकडून वरिष्ठांना निनावी अर्ज देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो.
- महिला पोलीस कॉन्स्टेबल

रात्रपाळी नाही म्हणून...
महिला म्हणून कार्यालयात काम करताना अनेक पुरुष सहकाऱ्यांकडून ‘तुम्हाला काय रात्रपाळी करावी लागत नाही, करून बघा एकदा...’ अशा शब्दांत हिणवले जाते. मुंबई-पुणेसारख्या शहरांमध्ये महिला कर्मचाऱ्यांवर बलात्कारासारखी प्रकरणे घडल्यानंतर तेथे कडक नियम करण्यात आले आहेत. शेवटी त्या-त्या शहरातील सामाजिक स्थितीवर महिलांनी रात्री काम करावे की नाही हे अवलंबून असते, याचा विचार केला जात नाही.
- दीप्ती औंधकर (नोकरदार)


ही काळजी कोण घेणार?
परिचारिका अरुणा शानभागचे प्रकरण आपणा सगळ्यांना माहीत आहे. कमी-अधिक प्रमाणात महिलांना रुग्णालयात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. रात्रपाळीमध्ये काम करीत असताना काहीवेळा रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या नियमांचा भंग करीत असतात. अनेकदा ते दारू पिऊन येतात. येईल त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशावेळी आमच्या सुरक्षिततेची काळजी घेणारी अशी यंत्रणाच नाहीय.
- हशमत हावेरी (महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशन)

Web Title: Security for women needs for night-time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.