सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर ठप्प
By Admin | Updated: February 23, 2015 00:28 IST2015-02-23T00:28:41+5:302015-02-23T00:28:58+5:30
बंदला अभूतपूर्व प्रतिसाद : सर्व संस्था-संघटना, तरुण मंडळे, उद्योजक-व्यापारी, फेरीवाले, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; सर्वत्र तीव्र निषेध

सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर ठप्प
कष्टकरी-कामगारांचे ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुकारलेल्या रविवारच्या राज्यव्यापी बंदमध्ये कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कोल्हापुरातील सर्व संस्था-संघटना, तालीम व तरुण मंडळे, उद्योजक-व्यापारी, फेरीवाले आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने ‘कोल्हापूर बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पानसरे यांना आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी संपूर्ण कोल्हापूरच थांबल्याचे चित्र होते.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या निधनाची वार्ता समजताच शनिवारी (दि. २१) कोल्हापूरकरांनी स्वयंस्फूर्तीने आपले संपूर्ण व्यवहार बंद करून श्रद्धांजली वाहिली होती. रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही भाकपने पुकारलेल्या ‘राज्यव्यापी बंद’मध्ये कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कोणतीही रॅली किंवा फिरून केलेल्या आवाहनाविना कोल्हापुरातील सर्व व्यवहार बंद होण्याची ही पहिलीच घटना आहे. बस, एस.टी., रिक्षा, वडाप, आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती. राजारामपुरी, शाहूपुरी, गुजरी, लक्ष्मीपुरी, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, गंगावेश परिसर, महाद्वार रोड आदी व्यापारी व गजबजलेल्या परिसरात दिवसभर शांतता होती.
सराफ बाजार, धान्य व्यापारी, किरकोळ व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी व्यवहार बंद ठेवून लाडक्या नेत्याप्रती प्रेम व्यक्त केले. उद्योग-व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग घेतल्याने या क्षेत्रातील उलाढालही ठप्प झाली. बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वच डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. बंदकाळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)
पानटपऱ्या बंद पाडल्या
दसरा चौकात रविवारी सकाळी पानपट्टी सुरू असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित पानपट्टीचालकास ती बंद करण्यास सांगितले.
श्रद्धांजली वाहून कार्यक्रम
कोल्हापूर शहरात अनेक पूर्वनियोजित कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे रविवारच्या ‘कोल्हापूर बंद’मध्ये काहींना सहभाग घेणे अशक्य होते; पण ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहूनच असे कार्यक्रम सकाळी सुरू झाले.
चौका-चौकांत पोलीस
शहरातील व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका, शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, संभाजीनगर चौक, राजारामपुरी जनता बझार चौक, आदी चौका-चौकांत रविवारी पोलीस थांबून होते. त्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधिकाऱ्यांना बंदोबस्त करण्यास सांगितले होते. त्याचबरोबर पोलीस मुख्यालयातील शंभर पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. दरम्यान, जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांमध्ये असा बंदोबस्त होता.
उत्स्फूर्त बंद
यापूर्वी पुकारलेला बंद आणि आजच्या बंदमध्ये कमालीचा फरक आहे. यापूर्वी पुकारलेल्या बंदमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शहरात फेरी काढून बंदचे आवाहन करत असत. रविवारच्या बंदमध्ये सहभागी व्हा, असे कोणत्याही प्रकारची फेरी काढण्यात आली नाही किंवा कोणी फिरून आवाहनही केले नाही, तरीही कष्टकरी जनतेचे आशास्थान असलेल्या गोविंद पानसरे यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूरकरांनी व्यवहार बंद ठेवले.