फसवणुकीची व्याप्ती वाढली

By Admin | Updated: October 5, 2014 00:47 IST2014-10-05T00:44:28+5:302014-10-05T00:47:20+5:30

‘लोककल्याण’ प्रकरण : महिलांनी साहित्य नेले

The scope of fraud increased | फसवणुकीची व्याप्ती वाढली

फसवणुकीची व्याप्ती वाढली

कोल्हापूर : ‘५०० रुपये भरा आणि १८ हजार रुपये कर्ज मिळवा,’ असे आमिष दाखवून महिला बचत गटांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या ‘लोककल्याण मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅप. सोसायटी’च्या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. कर्मचारी पसार झाल्याने संतप्त महिलांनी सोसायटीच्या बागल चौक कार्यालयातील संगणक, टेबल-खुर्च्यासह इतर साहित्य असा सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल टेम्पोतून भरून घरी नेला. या प्रकाराने राजारामपुरी पोलीस मात्र चक्रावून गेले आहेत.
बागल चौक येथील ‘लोककल्याण मल्टिस्टेट सोसायटी’च्या व्यवस्थापनाने कर्जाचे आमिष दाखवून महिला बचत गटांकडून प्रत्येकी ५०० रुपये भरून सदस्यत्व नोंदणी करून घेतली; परंतु पैसे भरूनही कर्ज मिळत नसल्याने संतप्त महिलांनी चार दिवसांपूर्वी कार्यालयात घुसून साहित्य बाहेर फेकले होते. महिलांचा उद्रेक पाहून कर्मचारी कार्यालयातून पसार झाले, ते पुन्हा फिरकलेच नाहीत. या प्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक आर. जे. नदाफ या करीत आहेत. त्यांनी महिलांकडून पासबुक तपासासाठी ताब्यात घेतली आहेत. या पासबुकावर पैसे दिसून येत आहेत. प्रशासनातील एकही कर्मचारी जाग्यावर नसल्याने कर्जाचा फॉर्म्युला कसा होता, याची माहिती मिळू शकलेली नाही. फसवणूक प्रकरणामध्ये तपास करून पुरावे हाती आल्यानंतर आरोपींना अटक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार अत्यंत बारकाईने तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी नदाफ यांनी सांगितले.
दरम्यान, एकीकडे फसवणूक प्रकरणाचा तपास सुरू असतानाच काही महिलांनी सोसायटीच्या कार्यालयातील साहित्य टेम्पोत भरून नेले. काही तासांत साहित्याने गजबलेले कार्यालय रिकामे झाले. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. तोपर्यंत महिला टेम्पो भरून गायब झाल्या होत्या.(प्रतिनिधी)
 

Web Title: The scope of fraud increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.