‘शिष्यवृत्तीची शाळा’ : जीवन शिक्षण मंदिर, अर्जुनवाडा
By Admin | Updated: July 16, 2015 21:37 IST2015-07-16T21:37:17+5:302015-07-16T21:37:17+5:30
--गुणवंत शाळा

‘शिष्यवृत्तीची शाळा’ : जीवन शिक्षण मंदिर, अर्जुनवाडा
अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील जीवन शिक्षण मंदिर या शाळेने राज्यात गुणवंत शाळा म्हणून नाव कमाविले आहे. शाळा अद्ययावत, अध्यापन शैक्षणिक साधनांची आणि कृतिजन्य अध्ययन पद्धतीची असून, मूल्यसंस्कार करण्यातसुद्धा अग्रेसर आहे. परिसर सफाई, वर्ग खोल्या, व्हरांडे, भिंती छत यांची स्वच्छता नजरेत भरणारी. एक प्रकारचे तन-मन रमविणारे असे आल्हाददायी वातावरण आहे. अर्जुनवाडा गावची लोकसंख्या २७०० असून, शाळेची पटसंख्या २७० इतकी आहे. अर्जुनवाडा गावची अस्मिता, अभिमान म्हणजे जीवन शिक्षण विद्या मंदिर होय. जीवन शिक्षण मंदिराच्या गुणवत्तेचा श्रीगणेशा हा शाळेच्या कमानीपासून सुरू होतो. भारदस्त कमान, भक्कम गेट आणि शाळेच्या इमारतीपर्यंत जाणारा रस्ता दुतर्फा हिरवाई अशी नेटकेपणाने उभी आहे. माहेरवाशिणीचं स्वागत जणू असाच अनुभव येतो. शिस्तबद्ध रांगेत उभी असलेली कपौंडलगतची झाडे व प्रशस्त क्रीडांगण आहे. शाळेचे बाह्यरूप इतके भारावून टाकणारे की, जणू ‘या, तुमचे मन:पूर्वक स्वागत’ असेच उल्हासाने म्हणणारे. खरं तर जिल्हा परिषदेची ही शाळा खासगी व इंग्रजी माध्यमाच्या वरचढच आहे.‘शिष्यवृत्तीची शाळा’ अशी या शाळेची ख्याती असून, आजपर्यंत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २१७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व ८७ विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. २०१२ मध्ये प्रियंका पाटील ही विद्यार्थिनी राज्यात पहिली आली. स्पर्धा परीक्षेची अखंड उज्ज्वल परंपरा असून, जादा तासाचे नियोजन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, रात्र अभ्यासिका व पालकांचे सहकार्य आहेच. शिवाय शशिकुमार पाटील हे शिक्षक शिष्यवृत्तीचे अचूक मार्गदर्शन व अथक प्रयत्न परिश्रम करणारे आहेत. त्यांनी चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती पुस्तकेही लिहिली आहेत.
चाणक्य नेट स्टडी याकडून २८००० रु.चे पहिली ते सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर शाळेत आहे. यामुळे पाठ्यपुस्तकातील प्रयोग, स्थळांचे वास्तववादी दर्शन मुलांना मिळते. कान, डोळे यांच्या कार्यातील फरक अनुक्रमे ऐकणे व पाहणे असून, या सुविधेमुळे पाहणे हे वास्तव तेच मुलांना अनुभवासाठी दिसते. सुसज्ज संगणक कक्ष व सहा संगणकांचा वापर मुले स्वत: करतात.
उल्लेखनीय कामे खूप, पण थोडक्यात व सारांशाने अशी की, बहुउद्देशीय कठडा बांधून शालेय परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. पिण्याचे पाणी स्वच्छ, माध्यान्न पोषण आहार नियमित व नियमानुसार चांगला आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छ व पुरेशी स्वच्छतागृहे आहेत. व्हरांडा, पायऱ्या, परिसर स्वच्छ, मनापासूनचे श्रम करून मुलांनी तो तसा उत्तम केलेला आहे.
सर्व वर्ग डिजिटल करून घेतले आहेत. वर्गवार भेटी देऊन मुलांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. १००टक्के विद्यार्थ्यांची पटनोंदणी आहे. उपस्थितीही १०० टक्के व्हावी म्हणून प्रयत्न आणि बऱ्याचअंशी यश येत आहे. बालसभा, बालआनंद मेळावा अगदी मौज व मनोरंजनाचे व मुलांना नियोजनाचा अनुभव देणारा आहे. पालक मेळावा, माता-पालक सभा नियमित व पुरेसा वेळ देऊन आयोजन केलेले असते.
बाजारी खाद्यपदार्थांपासून बचावासाठीचा संदेश देणारी खाद्य जत्रा, एकाग्रता वाढविण्यासाठी संमोहन प्रयोग, वनभोजन, निसर्ग भेट, आदींचे आयोजन केले जाते. शेतात जाऊन ठिबक सिंचन पद्धती पाहून, पिकांची माहिती घेऊन शेतीच्या मातीशी नाळ जोडण्याचा विचार व कृती यातून कृषी दिन साजरा करणारी शाळा-शिक्षक-विद्यार्थी.
- डॉ. लीला पाटील
शाळेची वैशिष्ट्ये
‘पुरस्कारांचे विद्यामंदिर’ अशीच शाळेची वास्तवता आहे. आदर्श शाळा हा जिल्ह्याचा पुरस्कार मिळालेला. वनश्री पुरस्कार देऊन वृक्षारोपण, बगीचा, झाडेवेली यांच्या सततच्या हिरवाईची दखल घेतलेली. स्वच्छ, सुंदर, हिरवी शाळा हा पुरस्कार दोनवेळा मिळालेला.
राजर्षी शाहू सर्वांगीण गुणवत्ता कार्यक्रमाच्या मूल्यमापनातून शाळा जिल्ह्यात पहिली आलेली. ‘अ’ श्रेणीच्या या शाळेने चालू वर्षी जिल्हास्तरावर गुणवत्तेमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेचे सातत्य हेच या शाळेचे वैशिष्ट्य आहे. त्याचाच पाठलाग करणारे शिक्षक व ग्रामस्थांचे सहकार्य. सातत्याने पहिल्या तीन क्रमांकांत हमखास असणारी शाळा.
रम्य वातावरण, आनंददायी शिक्षण, सेवाभावी शिक्षक शिस्त व शाब्बासकी यांचा समन्वय साधणारे, पालक व ग्रामस्थांचा विश्वास संपादन केलेले हे गुरुजन आहेत.
शून्य शाळाबाह्यता ही स्थिती निर्माण करण्यातच शाळेच्या गुणवत्तेचे यश दिसते. एकही मूल शाळाबाह्य नसल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळले.
लोकसहभागातून एक लाख आणि शासनाकडून एक लाख रुपये असा निधी उपलब्ध व त्यातून ई-लर्निंगची सुविधा साकारलेली आहे.
राधानगरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून स्मार्ट बोर्ड पुरविला. शाळेने साध्य केलेल्या गुणवत्तेमुळे हा बोर्ड आणि त्याच्या साहाय्याने अध्यापन, अध्ययन डिजिटल झाले.