‘शाळा बंद’तून कोल्हापूर अलिप्त
By Admin | Updated: December 12, 2014 00:34 IST2014-12-12T00:31:11+5:302014-12-12T00:34:09+5:30
आंदोलनात कोल्हापूर जिल्हा शिक्षक परिषदेने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

‘शाळा बंद’तून कोल्हापूर अलिप्त
कोल्हापूर : नवीन संच मान्यतेमुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होत आहेत. याच्या निषेधार्थ शिक्षक परिषदेने उद्या, शुक्रवारी राज्यव्यापी माध्यमिक शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, आंदोलनात कोल्हापूर जिल्हा शिक्षक परिषदेने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळा बंद आंदोलनापासून जिल्हा अलिप्त राहणार आहे.
हक्काचे शिक्षण कायद्यानुसार प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये बदल केले जात आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार संच मान्यता, शिक्षक मान्यता केली जात आहे, असे एका बाजूला चित्र असताना दुसऱ्या बाजूला झपाट्याने विद्यार्थीसंख्या कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होत आहेत. अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा आॅफलाईन पद्धतीने पगार काढण्याचा आदेश शासनाने दिला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी चिंताग्रस्त आहेत. शिक्षणाविषयी शासनाने अलीकडे घेतलेल्या निर्णयांच्या विरोधातही संस्थाचालक, शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाकडे अर्ज, विनंत्या केल्या तरी गांभीर्याने घेतले जात नसल्याची शिक्षक संघटनांची भावना होत आहे. यातूनच उद्या शिक्षक परिषदेने राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, यामध्ये जिल्हा सहभागी होणार नाही. परिणामी, शाळा सुरळीतपणे सुरू राहणार आहेत.
शाळा बंद आंदोलनात कोल्हापूर जिल्हा सहभागी होणार नाही. त्यामुळे उद्या नियमित शाळा सुरू राहतील.
- ज्योत्स्ना शिंदे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी
शाळा बंद आंदोलनात जिल्ह्यातील शाळांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या बैठक घेणार आहे.
- उदय पाटील, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद