‘सौंदत्ती’साठी कर्नाटकच्या बसेसना भक्तांची पसंती

By Admin | Updated: January 24, 2017 23:24 IST2017-01-24T23:24:32+5:302017-01-24T23:24:32+5:30

भाडे कमी : महाराष्ट्रात प्रतिकिमी ३४, तर कर्नाटकचा ३२ रुपये तिकीट दर

For the 'Saundatti' Karnataka devotees prefer the devotees | ‘सौंदत्ती’साठी कर्नाटकच्या बसेसना भक्तांची पसंती

‘सौंदत्ती’साठी कर्नाटकच्या बसेसना भक्तांची पसंती

प्रकाश पाटील-- कोपार्डे --सौंदत्ती यात्रेला जिल्ह्यातून एस. टी.ने भाविक मोठ्या प्रमाणात जातात. तुलनात्मक विचार करता कर्नाटकची एस. टी. बसची सेवा दर, सीटची संख्या पाहता आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरत आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात कर्नाटक बससशी प्रासंगिक करार करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र परिवहन मंडळाने जेवढ्या किलोमीटरचा प्रवास तेवढेच पैसे आपण घेत आहे. महाराष्ट्र एस. टी. बसचा करार केल्यास प्रत्येक गाडीमागे एक हजार ८०० रुपयांची बचत होते, असा दावा केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सौंदत्ती येथील यल्लमा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची मागणी ओळखून कर्नाटक व महाराष्ट्र परिवहन मंडळांकडून सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक एस.टी. प्रशासनाने ३२ रुपये प्रति कि.मी. दर जाहीर करीत पहिल्या ६०० कि.मी.साठी २० हजार ७५२ रुपये अधिक दोन हजार ४८, असे एकूण २३ हजारांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये सोगल सोमनाथ, बाळेकुंद्री, चिंचणी मायाक्का व नरसोबाचीवाडी अशा स्थळांना भेटी देता येणार आहेत. या बसेसना ५५ सीटस् असल्याने एकूणच भाडे करार स्वस्तात असल्याचे पटवून देण्यासाठी कर्नाटक एस.टी. प्रशासनाने प्रचार आणि प्रसार सुरू केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील भाविकांनी कर्नाटक एस.टी.बरोबर करार करण्यासाठी निपाणी येथे मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे.
मात्र, याचवेळी महाराष्ट्र एस.टी. प्रशासनाने आपली सेवा उत्तम असण्याबरोबर जेवढा प्रवास तेवढेच भाडे घेतले जाणार असून, एका गाडीमागे करारधारकाची १८०० रुपयांची बचत होईल, असा दावा केला आहे. याबाबत संभाजीनगर स्थानकप्रमुख व्ही. बी. हवालदार म्हणाले, सर्वच प्रवासी इतर तीर्थस्थळांना भेटी देत नाहीत. त्यामुळे सरळ सौंदत्ती ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या भाविकांना आर्थिक भुर्दंड बसू नये, हा हेतू ठेवून सहा वेगवेगळ्या मार्गाचे किलोमीटर व मुक्कामानुसार वेगवेगळे दर केले आहेत. कर्नाटक एस.टी. मात्र करारधारकांकडून ६०० कि़मी.चे भाडे वसूल करते. आमचे दर कोल्हापूरपासूनचे असून, एका मुक्कामासाठी १६ हजार ९०० भाडे आहे, तर तीन मुक्कामांसाठी २० हजार ३०० भाडे असून, यामध्ये हॉल्टचार्ज व डिपॉझिटही आहे. यातील प्रासंगिक कराराची मुदत संपताच १० टक्के रक्कम परत केली जाणार आहे. यामुळे १८ हजार २०० रुपये भाविकांना भाडे परवडणार असून, कर्नाटक बससाठी मात्र २० हजार ७५२ रुपये भाडे द्यावे लागणार आहे. हा फरक मुक्कामानुसार पाहिल्यास १८०० ते २५०० रुपयांपर्यंत कर्नाटक जादा घेत असल्याचे दिसेल. यामुळे जरी प्राथमिक अवस्थेत कर्नाटक एस.टी. करार स्वस्त वाटत असला तरी तो तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास महागच होत असल्याचा दावा केला.

महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील तुलनात्मक फरक
लोकांच्या इच्छेनुसार व आर्थिक कुवतीनुसार प्रवास करता यावा, म्हणून सहा वेगवेगळे मार्ग, त्यांचे किलोमीटर व त्यांचे मुक्काम याप्रमाणे दर ठरविले आहेत. भाविकांनी सौंदत्ती यात्रेसाठी महाराष्ट्र एस.टी. बसेससाठी करार करावेत. तेही ३१ जानेवारीपर्यंतच मुदत असल्याने सवलतीसाठी लवकर करार करावेत.
- व्ही. बी. हवालदार, स्थानकप्रमुख, संभाजीनगर.

Web Title: For the 'Saundatti' Karnataka devotees prefer the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.