सतेज यांचे बंड, काँग्रेस मात्र थंड मंडलिकांसाठी जोडण्या : महाडिकांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:48 IST2019-03-14T00:46:44+5:302019-03-14T00:48:06+5:30
बरोबर पाच वर्षांपूर्वी याच मोसमामध्ये एका संध्याकाळी तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या बंगल्याच्या मागच्या लॉनवर राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांना घेऊन पोहोचले. मतभेद असले तरी सतेज यांनी महाडिक यांना मदत करावी, असे आवाहन केले गेले. कॉँग्रेस-राष्ट्रवादी एकवटली.

सतेज यांचे बंड, काँग्रेस मात्र थंड मंडलिकांसाठी जोडण्या : महाडिकांना विरोध
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : बरोबर पाच वर्षांपूर्वी याच मोसमामध्ये एका संध्याकाळी तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या बंगल्याच्या मागच्या लॉनवर राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांना घेऊन पोहोचले. मतभेद असले तरी सतेज यांनी महाडिक यांना मदत करावी, असे आवाहन केले गेले. कॉँग्रेस-राष्ट्रवादी एकवटली. महाडिक खासदार झाले. त्यानंतर सहाच महिन्यांनी सतेज पाटील यांचा पराभव करत अमल महाडिक आमदार झाले.
ग्रामविकास आणि गृहराज्यमंत्रिपदावर प्रचंड काम करूनही झालेला हा पराभव पाटील यांनी फारच मनाला लावून घेतला. तीच भळभळती जखम उरात घेऊन आज सतेज पाटील यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. त्याच वेदनांनी ते धनंजय महाडिक यांच्याविरोधात सक्रिय बनले आहेत.
अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस सध्या थंड आहे. अजूनही एकतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही आणि आघाडीचे उमेदवारही जाहीर झालेले नाहीत, असे कारण काँग्रेसकडून सांगितले जात आहे.
महिनाभर आधी जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये बदल झाला. सतेज पाटील यांच्या जवळचे प्रकाश आवाडे जिल्हाध्यक्ष झाले. त्यामुळे त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे. आजरा तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर हे ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांना मानणारे आणि आपटे हे महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांना मानणारे. त्यामुळेच नार्वेकर यांना बदलून त्या ठिकाणी आजरा साखर कारखान्याचे संचालक विष्णुपंत केसरकर यांची नियुक्ती दोन दिवसांत केली जाणार आहे.
प्रकाश आवाडे यांचे प्रभाव क्षेत्र हे हातकणंगले, शिरोळ तालुका आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आवाडे हे सतेज पाटील यांच्या सल्ल्यानुसार काम करतील असेच दिसते. करवीरचे निर्णय घेताना मात्र त्यांना राज्य उपाध्यक्ष पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांच्यात समतोल राखावा लागणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सध्या ‘गोकुळ’चे संचालक असलेले काँगे्रस नेते धनंजय महाडिक यांच्या कामात लागले आहेत. त्यांनी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता काम सुरू केले आहे. मात्र, जेवढी काँग्रेस शिल्लक आहे ती संपूर्णपणे सक्रिय करण्यासाठी वेळ लागणार आहे.त्यातही सतेज पाटील यांना मानणारे सहा तालुक्यांत जे कार्यकर्ते आहेत. ते संजय मंडलिक यांच्यासाठी सक्रिय झाल्याचेही पाहावयास मिळत आहेत.सतेज पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत महाडिक यांना मदत न करण्याचा निर्धार केला असून ‘अगदी कुणाचाही निरोप आला तरी थांबणार नाही.’अशीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे सहाही तालुक्यांत त्यांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे.
डी. वाय. यांच्या प्रवेशाचे दडपण नाही
राष्ट्रवादी काँग्रेसने मध्यंतरी डॉ. डी. वाय. पाटील यांना पक्षात घेतले. धनंजय महाडिक यांनी डी. वाय. यांचा फोटो जाहिरातीमध्ये वापरण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा कोणताही परिणाम सतेज पाटील यांच्यावर झालेला नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरूच ठेवले आहे.
दिल्लीतून निरोपाआधी जोडण्या लावल्या
आणखी काही दिवसांनी दिल्लीहून काँग्रेसकडून सतेज पाटील यांना निरोप येण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांच्यावर दुसऱ्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारीही दिली जाईल. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर काहीही होऊ शकते. त्याची जाणीव असलेल्या सतेज पाटील यांनी नंतर करायचे ते काम आताच संपवत आणले असून संजय मंडलिक यांना जोडण्या लावून दिल्याचे दिसत आहे.