सर्जेराव विभूते यांचे कार्य इतरांसाठी आदर्शवत : महेश जोतराव : कार्यगौरव समितीतर्फे झाला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:12+5:302021-01-08T05:16:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तत्वनिष्ठ व वैचारिक पाया भक्कम असणारा कार्यकर्ता आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर स्वस्थ बसत नाही. महावितरण ...

सर्जेराव विभूते यांचे कार्य इतरांसाठी आदर्शवत : महेश जोतराव : कार्यगौरव समितीतर्फे झाला सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘तत्वनिष्ठ व वैचारिक पाया भक्कम असणारा कार्यकर्ता आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर स्वस्थ बसत नाही. महावितरण कंपनीमध्ये चाळीस वर्षे काम करताना लोकसेवक म्हणून ग्राहकहिताचे कामकाज, संघटनेच्या माध्यमातून कामगारांचा आवाज बनलेले आणि नि:स्वार्थीपणे सामाजिक कार्य करणारे सर्जेराव विभूते निवृत्तीनंतरही आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रात नव्या धडाडीने काम करतील अशा अपेक्षा एसईबी वर्कर्स फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव यांनी येथे व्यक्त केल्या.
कोल्हापूर परिमंडल विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ सर्जेराव पांडूरंग विभूते हे प्रदीर्घ सेवेनंतर ३१ डिसेंबरला निवृत्त झाले. यानिमित्त कार्यगौरव समितीतर्फे त्यांच्या कार्याचा गौरव समारंभ झाला. ‘कॉम्रेड सर्जेराव विभूते कार्यगौरव’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले. लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सरलाताई पाटील, बाबूराव तारळी, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विभूते, त्यांच्या पत्नी संजीवनी यांचा सत्कार करण्यात आला.
महेश जोतराव म्हणाले, ‘विभूते यांनी नोकरी करताना सामाजिक बांधीलकी जपली. उत्पन्नातील मोठा वाटा सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यासाठी मोठे मन लागते. विभूते यांनी या भावनेतून संघटना, सामाजिक संस्थांना मदत केली. त्यांच्यासारख्या तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्याला विविध क्षेत्रे खुली आहेत.
‘स्वत: जगताना इतरांना जगविणारी माणसे समाजासाठी आदर्शवत असतात. विभूते त्याच पठडीतील असल्याचे ’वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी सांगितले. सामान्य कुटुंबातील जन्म परंतु कष्टाची सवय आणि चिकाटी या गुणवैशिष्ट्यामुळे विश्वास संपादन केला. विचारांची श्रीमंती होती. कुटुंबाची भक्कम साथ लाभली. त्यामुळेच जीवनात यशस्वी झाल्याच्या भावना विभूते यांनी व्यक्त केल्या. शकील महात यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.
०५०१२०२१-कोल-विभूते सत्कार
कोल्हापूर परिमंडल विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ सर्जेराव विभूते यांचा कार्यगौरव समितीतर्फे निवृत्तीनिमित्त सत्कार झाला. यावेळी ‘कॉम्रेड सर्जेराव विभूते कार्यगौरव’ अंकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले.