संजय पाटील यांच्या नियोजनाचे ‘सतेज’ यांना बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST2021-05-06T04:24:27+5:302021-05-06T04:24:27+5:30
(संजय डी. पाटील व ऋतुराज पाटील यांचे फोटो वापरावेत) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची ...

संजय पाटील यांच्या नियोजनाचे ‘सतेज’ यांना बळ
(संजय डी. पाटील व ऋतुराज पाटील यांचे फोटो वापरावेत)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची ताकद पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत असली तरी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांनी पडद्यामागे राहून लावलेल्या जोडण्या उपयुक्त ठरल्या. एकीकडे संजय पाटील यांच्या यशस्वी जोडण्या आणि दुसऱ्या बाजूला आमदार ऋतुराज पाटील यांच्या व्यक्तिगत संपर्कामुळे मंत्री पाटील यांना लढण्याचे खरे बळ मिळाले.
राजकीय असो अथवा कोणतीही लढाई, घरातील पाठबळ असेल तर तिथे यश मिळवणे अधिक सोपे जाते. त्यातही भाऊ सोबत असेल तर लढणाऱ्याला दहा हत्तीचे बळ येते आणि कोणतेही अवघड आव्हान सहज परतवून लावता येते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात त्यांचे बंधू संजय पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. मंत्री पाटील आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्याचा पाया हा संजय पाटील यांनी रचला, हे सत्य आहे. दोन्ही भावांमध्ये कमालीची एकवाक्यता आणि आत्मविश्वास पहावयास मिळतो. त्याचा प्रत्यय महापालिका, विधान परिषद, विधानसभा आणि आता ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आला.
‘गोकुळ’ कोणत्याही परिस्थितीत घ्यायचाच, या ईर्षेने मंत्री पाटील पाच वर्षे काम करत होते. या कालावधीत मंत्री पाटील व संजय पाटील यांच्यात निवडणूक व्यूहरचनेबद्दल चर्चा व्हायची. निवडणूक सुरू झाल्यानंतर मंत्री पाटील मैदानात उतरले, त्यावेळी पडद्यामागील सगळी यंत्रणा संजय पाटील यांनी सांभाळली. नियोजनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात की नाही, यावर त्यांचे बारीक लक्ष असल्यानेच लावलेल्या सर्व जोडण्या शंभर टक्के यशस्वी झाल्या.
मंत्री पाटील यांच्या सोबत आमदार ऋतुराज पाटील हेही थेट ठरावधारकांच्या संपर्कात होते. त्यांनी ठेवलेला व्यक्तिगत संपर्क आणि संजय पाटील यांच्या पडद्यामागील जोडण्यांनी मंत्री पाटील यांना लढण्याचे खरे बळ मिळाले.