पोर्ले तर्फ ठाणे : प्रेमप्रकरणातून प्रियकराने जबरदस्तीने तणनाशक पाजलेल्या सानिका ऊर्फ गायत्री माणिक पोवार (वय १८, रा. वाघवे) हिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी प्रियकर आदित्य पाटीलवर खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला शिक्षा करावी, असा आरोप सानिकाचे नातेवाईक संतोष गोळे आणि शशिकांत चव्हाण यांनी केला आहे. आदित्य दिलीप पाटील (२१, रा. वाघवे, ता. पन्हाळा) असे प्रियकराचे नाव असून, याप्रकरणी त्याच्यावर पन्हाळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.शनिवारी (दि. ३ मे) सानिकाच्या आईने फिर्याद दिल्याप्रमाणे आदित्यला पन्हाळा पोलिसांनी मामाच्या घरातून अटक केली होती. तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. गुरुवारी दुपारी सानिकाचा मृत्यू झाल्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामिनावर मुक्तता केल्याने न्यायालयीन आदेशानंतर आदित्यला ताब्यात घेणार आहे.या प्रकरणी तपास सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, अधिक चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल, अशी माहिती पन्हाळा पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली. ही घटना मंगळवारी (दि.३०) दुपारी लक्ष्मीपुरी परिसरात घडली होती.सानिका आणि आदित्य पाटील यांचे प्रेमसंबंध होते. ती काॅलेजला जातो म्हणून घरातून बाहेर पडली होती. दुपारी तिच्या मैत्रिणीचा तिच्या वडिलांना फोन आला की, तिने औषध प्राशन केले असून, आदित्यने तिला उपचारांसाठी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.आरोपीने घात केलाआपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आदित्यने तिचा घात केला आहे. त्याचे ती ऐकत नव्हती म्हणून त्याने तिला तणनाशक जबरदस्तीने पाजले. त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
Kolhapur: प्रियकराने जबरदस्तीने तणनाशक पाजले, वाघवेतील 'त्या' मुलीला अखेर मृत्यूने गाठले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:10 IST