‘एमपीएससी’मध्ये सांगलीची बाजी
By Admin | Updated: April 7, 2015 01:16 IST2015-04-07T00:26:25+5:302015-04-07T01:16:30+5:30
एकोणीस विद्यार्थ्यांचे यश : स्पर्धा परीक्षेतील यशासाठी धडपडणाऱ्यांनाही मिळाली ऊर्जा

‘एमपीएससी’मध्ये सांगलीची बाजी
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राजपत्रित अधिकारी ‘वर्ग एक’ आणि ‘वर्ग दोन’च्या पदांसाठी झालेल्या राज्यसेवा परीक्षेत सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एकोणीस विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा जून २०१४ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येऊन रविवारी सायंकाळी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सांगलीतील कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतील तेरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यामध्ये नंदा पाराजे (कुपवाड) यांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. तसेच मिताली संचेती (पोलीस उपअधीक्षक ), तृप्ती चव्हाण (राज्य उत्पादन शुल्क विभाग उपअधीक्षक), श्वेता संचेती (तहसीलदार), अमित निकम (नायब तहसीलदार ), आस्मा मुजावर (नायब तहसीलदार), आनंदराव देवकर (नायब तहसीलदार), रमेश रुणवाल (गटविकास अधिकारी), कमलेशकुमार जैन (नायब तहसीलदार), सुधीर सोनवणे (नायब तहसीलदार), चंद्रकांत गुणाले (नायब तहसीलदार), प्रवीण पाटील (गटविकास अधिकारी) यांनीही यश मिळविले आहे.
वाळवा तालुक्यातील कामेरी येथील रणजित महादेव पाटील यांची सहायक निबंधकपदी, इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीची विद्यार्थिनी प्रज्ञा विजयसिंह देशमुख यांची सहायक गटविकास अधिकारीपदी, तर फार्णेवाडी (बोरगाव) येथील योगेश भूपाल जमदाडे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली. तासगाव येथील विजय तानाजी पाटील यांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याचप्रमाणे आष्टा येथील नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतील धनश्री यादव (नायब तहसीलदार), अमोल जाधव (गटविकास अधिकारी), प्रियांका सावंत (भूमी अभिलेख अधिकारी) यांनीही यश मिळवले. विविध क्षेत्रातून या यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धा परीक्षेत सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाने उत्साहाचे वातावरणही निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)