सांगली बनले वन्यप्राण्यांच्या तस्करीचे केंद्र

By Admin | Updated: June 12, 2015 00:37 IST2015-06-12T00:11:06+5:302015-06-12T00:37:59+5:30

तपास फाईलबंद : वाघाची कातडी, सर्पविषानंतर आता हरणांचे तस्कर सापडले

Sangli became a wildlife trafficking center | सांगली बनले वन्यप्राण्यांच्या तस्करीचे केंद्र

सांगली बनले वन्यप्राण्यांच्या तस्करीचे केंद्र

सचिन लाड -सांगली -सर्पविष... वाघाची, बिबट्याची कातडी, कासव, म्हांडूळ आणि हरण... सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत या वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तस्कर रंगेहात आढळून आले, पण त्यांचे पुढे काय झाले? तस्कर जामिनावर सुटले आणि आजही ते पुन्हा याच तस्करीत गुरफटले आहेत. पोलिसांनी तपास गुंडाळला. वन विभागाने हात झटकले. यामुळे तस्करांना कुणाचीही भीती राहिली नाही. वन्यप्राण्यांची सुटका करुन तस्करांना अटक केली जात असली तरी, तपास मुळापर्यंत जात नसल्याचे वास्तव आहे.
कोट्यवधी रुपयांचे सर्पविष पोलिसांनी सातत्याने पकडले आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी या विषाचा उपयोग केला जात असल्याने, त्याला मोठी मागणी आहे. विषारी सर्प पकडून त्याचे विष काढणारे अनेकजण जिल्ह्यात कार्यरत आहेत. ते पोलिसांना सापडलेही होते. मात्र पुढे त्यांच्या ‘रॅकेट’मधील कोणीही हाती लागले नाही.
गतवर्षी वाघांची कातडी विकणाऱ्या टोळीतील नऊ जणांना पकडण्यात आले होते. सुरुवातीला चौघे हाती लागले. चौकशीतून एकमेकांची नावे पुढे येत गेली आणि पोलिसांनी त्यांना शिताफीने अटकही केली.
त्यांच्याकडून तीन वाघांची व एक बिबट्याचे कातडे जप्त केले होते. या कातड्यावर वाघ व बिबट्यास गोळी मारून हत्या केल्याची खूण होती. तपासाची व्याप्ती वाढत गेली. पण अटक केलेल्या संशयितांनी वाघाची शिकार कुठे केली, कातडी कोठून आणली, याचा शेवटपर्यंत उलगडा झाला नाही. संशयित आता जामिनावर बाहेर येऊन पुन्हा उजळमाथ्याने फिरत आहेत.
सहा महिन्यापूर्वी बुधगाव (ता. मिरज) येथील एका तरुणास वाघाचे कातडे विकताना कोल्हापूर जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यात वाघाच्या कातड्याची तस्करी करुन त्याची विक्री करणारे ‘रॅकेट’ असल्याचे स्पष्ट होते. वन विभागाने केवळ कारवाईची माहिती घेतली. कातड्यावरून वाघाचे वय सांगितले. परंतु तपासात कोणतीही मदत केली नाही.
मध्यंतरी अमावास्येला पांढऱ्या रंगाच्या कासवाची पूजा केल्यास आर्थिक प्राप्ती होते, असा बोलबाला सुरू होता. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या कासवाला मोठी मागणी होऊ लागली. एक कासव ५० ते ६० हजाराला विकले जात होते. कासवांची तस्करी करणारेही अनेकजण सापडले होते. तसेच अमावास्येला घुबडाची पूजा केल्यासही आर्थिक भरभराट होते, अशीही अंधश्रद्धा आहे.
आजही अनेक घुबडे पकडून त्यांची तस्करी केली जात आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी जिल्ह्यातील पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे सर्पविषही पकडले होते.


सर्पविष नव्हेच!
दीड वर्षापूर्वी पोलिसांनी जवळपास एक लिटर सर्पविष पकडले होते. त्याची किंमत कोट्यवधी रुपये होती. तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालात ते सर्पविष नसल्याचे उघडकीस आले होते. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा सर्पविष पकडण्याची कारवाई केली नाही. सातत्याने वन्यप्राणी अथवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारे तस्कर सांगलीत सापडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी जिवंत सांबर सांगलीत आढळले होते. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात ते मृत झाले. पण कोणी तरी शिकार करुन ते आणल्याची चर्चा रंगली होती.

Web Title: Sangli became a wildlife trafficking center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.