समीरच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ
By Admin | Updated: September 27, 2015 00:32 IST2015-09-27T00:32:07+5:302015-09-27T00:32:30+5:30
पानसरे हत्याप्रकरण : ‘दोन डोकी उडवली, आता गोदावरीत दोन डुबक्या मारून येतो’ ; मोबाईल संभाषणात संदर्भ

समीरच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत शनिवारी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायाधीश (क्रमांक ६) वैशाली व्ही. पाटील यांनी हा निर्णय दिला. प्रचंड पोलीस बंदोबस्त व अत्यंत तणावाच्या वातावरणात शनिवारी ही प्रक्रिया झाली.
गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये संशयित, ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याच्याकडून जप्त केलेले ३१ मोबाईल कोणाचे आहेत, यापूर्वी त्याच्या मोबाईल संभाषणामध्ये ‘दोन डोकी उडविली आहेत,’ असे पुढे आले होते. ‘आता नाशिक येथील कुंभमेळ्यात गोदावरी नदीमध्ये दोन डुबक्या मारून येतो,’ असेही तो मित्र सुमित खामकर याच्याशी बोलल्याचे मोबाईल संभाषणावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन्ही संभाषणांचा संदर्भ पानसरे हत्येशी साम्य सांगणारा आहे. त्याचा तपास होणे आवश्यक आहे, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश वैशाली पाटील यांनी समीरला उद्या, सोमवारपर्यंत पोलीस कोठडीतच ठेवण्याचा निर्णय दिला.
समीर गायकवाड याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला मुख्य तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी शनिवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात चेहऱ्यावर काळा बुरखा घालून न्यायालयात हजर केले. खचाखच भरले होते. यावेळी तपास अधिकारी चैतन्या यांनी पोलिसांनी १६४ साक्षीदारांकडे चौकशी केली. त्यामध्ये पनवेल येथे आश्रमात राहणारे अजयकुमार प्रजापिता यांच्याकडून मोबाईल दुरुस्तीसाठी आणल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलीस अजयकुमार यांच्या शोधात आहेत. फोंडा-गोवा येथे राहणारी मैत्रीण श्रद्धा पोवार व मित्र सुमित खामकर या दोघांबरोबर पानसरे हत्येसंदर्भातील मोबाईल संभाषण प्राप्त झाले आहे. त्यांच्यापर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत. गणेशोत्सव सुरू असल्याने पोलिसांना वेळेअभावी तपास पूर्ण करता आलेला नाही. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या मोबाईल सीमकार्डवरून अन्य व्यक्तींचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली.
त्यानंतर समीरकडून मोबाईलची ३१ सीमकार्ड जप्त केली आहेत. त्यावरून त्याने कोणाशी आणि कधी संपर्क साधला, त्याबद्दल तपास करायचा आहे; त्यामुळे गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी बाजू सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी मांडली. संशयित गायकवाड याच्या वतीने सांगली येथील अॅड. एम. एम. सुहासे आपल्या युक्तिवादात म्हणाले, आम्ही कोणावर अन्याय होऊ नये म्हणून समीरचे वकीलपत्र घेतले आहे. समीरच्या आवाजाचे नमुने जुळले म्हणजे त्यानेच खून केलाय असे नाही. ज्या कारणासाठी पोलिसांनी कोठडी वाढवून घेतली त्याचा तपासच पोलिसांनी केलेला नाही. रुद्र आणि समीरचा काहीही संबध नाही. २३ मोबाईल आणि ३१ सीमकार्ड मिळाली आहेत. मग पुन्हा कोठडी कशाला हवी आहे, अशी विचारणही त्यांनी केली. सरकारी वकीलांना युक्तिवादासाठी मदत करताना अॅड. विवेक घाटगे म्हणाले, कोल्हापूरमध्ये सध्या गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे चौकशी आणि तपासासाठी पोलिस बळ कमी पडत आहे, म्हणून समीरची पोलिस कोठडी वाढवून मिळावी. समीरला कुंभ मेळ्यात दोनच डुबक्या का मारायच्या आहेत. यावरुन दोन लोकांची हत्या केली म्हणून दोनचं डुबक्या असे दर्शवायचे आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश पाटील यांनी संशयित आरोपीला उद्या, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालय परिसरात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)
नवीन न्यायाधीश
पानसरे हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक करून पहिल्यांदा कसबा बावडा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश (क्रमांक ६) आर. डी. डांगे यांच्यासमोर हजर केले. यावेळी त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यांदा त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अपर्णा कुमार जैनापुरे यांच्यासमोर हजर केले. त्यानंतर तिसऱ्यांदा पोलिसांनी न्यायाधीश वैशाली पाटील यांच्यासमोर हजर केले. त्यांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. एकाच न्यायालयात सुनावणीवेळी तीनवेळा नवीन न्यायाधीश होते. या बदलाची चर्चा परिसरात होती.
वकिलांमध्ये
शाब्दिक चकमक
न्यायालयात सुरुवातीस पानसरे कुटुंबीयांच्या वतीने ३०० वकिलांनी वकीलपत्र सादर केले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद मांडताना आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतल्याने काही काळ दोन्ही बाजूच्या वकिलांत शाब्दिक चकमक उडाली. न्यायाधीशांनी त्यांना शांत राहण्याची सूचना करीत, एकजण बोलत असताना दुसऱ्याने मध्ये बोलू नये, अशी सूचना केली.