संभाजीराजे विरुद्ध मंडलिक, शेट्टी लढणार धैर्यशील मानेंशी; कोल्हापूर-हातकणंगलेतील संभाव्य चित्र
By विश्वास पाटील | Published: January 16, 2024 11:28 AM2024-01-16T11:28:56+5:302024-01-16T11:30:06+5:30
कोल्हापुरात मात्र अजूनही किंतू-परंतु शिल्लक
विश्वास पाटील, कोल्हापूर: कोल्हापूरमधून खासदार संजय मंडलिक विरुद्ध माजी खासदार संभाजीराजे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानीचे राजू शेट्टी असे लोकसभेच्या निवडणुकीतील संभाव्य राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामध्येही कोल्हापूरमध्ये अजून काही किंतू-परंतु असले तरी हातकणंगलेतील लढत मात्र निश्चित झाल्याचे मानण्यात येते. तिथे शेट्टी यांनी थेट प्रचाराचाच नारळ फोडला आहे.
कोल्हापूरमध्ये ही जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु उमेदवारांबाबतच्या चर्चेला मात्र चांगलीच धार आली आहे. त्यात अचानक माजी खासदार संभाजीराजे यांचे नाव पुढे सरकले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचा सरप्राइज चेहरा तेच असावेत, अशाच हालचाली आहेत. संभाजीराजे यांच्या वाढदिवस तयारीची एरव्ही बैठक कधी झाली हे कळायचे नाही, परंतु यंदा त्याला प्रथमच व्यापक स्वरूप आले. वाढदिवसाच्या नियोजनापेक्षा लोकसभेचाच आग्रह कार्यकर्त्यांकडून जास्त झाला. सद्य:स्थितीत संभाजीराजे यांच्यासमोरही अन्य चांगला राजकीय पर्याय उपलब्ध नाही. त्यांनी स्वराज्य संघटना कम पक्ष काढला असला तरी तो चालविणे तितके सोपे नाही. या पक्षाच्या माध्यमातून राज्यभर काही उमेदवार उभे करून दबाव गट तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु कारणे काहीही असली तरी त्यांच्या या संघटनेला बळकटी येण्यापूर्वीच बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
संभाजीराजे यांनी नाशिक मतदारसंघातून मोर्चेबांधणी केली होती. परंतु तिथे संघटना विस्कळीत झाली. महाविकास आघाडीतून त्यांना कोल्हापुरातून संधी मिळत असेल तर हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. आघाडीलाही त्यांच्या रूपाने हवा निर्माण करू शकेल असा उमेदवार मिळू शकतो. त्यांनी कोणत्या पक्षातर्फे लढायचे हा महत्त्वाचा गुंता आहे. कारण या जागेवर तसा शिवसेना ठाकरे गटाचा नैसर्गिक हक्क आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजेंनी शिवसेनेच्या उमेदवारीस नकार दिला होता. त्यातून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. परंतु शरद पवार पुढाकार घेऊन हा गुंता सोडवू शकतात.
दुसरा एक असाही विचार पुढे आला आहे, की या जागेसाठी शाहू महाराज यांच्याच उमेदवारीसाठी आग्रह धरावा. गेली दहा वर्षे ते सातत्याने धर्मांध आणि जातीय शक्तीच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडत आहेत. या विचारांच्या मागे कोल्हापूर उभे राहते, हा संदेश राज्यभरात देण्यासाठी त्यांनीच मैदानात उतरावे, असाही मतप्रवाह विचारवंतांमध्ये आहे. जनमाणसांत त्यांच्याबद्दल असलेला आदरभाव, बहुजन समाजातील स्थान या गोष्टीही त्यांच्या पाठीशी आहेत. वय हा एकच मुद्दा त्यांच्यासाठी आड येणारा असला तरी त्यांच्या वयाचे अनेक नेते राजकारणात आहेतच.
महायुतीतून या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच जाहीर केले आहे. घडणार तसेच होते. कारण त्याच अटीवर हे दोन्ही खासदार फुटीमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत गेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच खासदार संजय मंडलिक आणि खासदार माने हेच उमेदवार असतील. आपल्यासोबत आलेल्या खासदारांना निवडून आणणे ही मुख्यमंत्र्यांचीही जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राहायचे असेल तर त्यांना आपले आहे ते बळ तरी शाबूत ठेवावे लागणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्यावर लढलो तर लोक आपल्याला जास्त बळ देतात, याची प्रचिती गतवेळच्या पराभवानंतर राजू शेट्टी यांना आली आहे. त्यामुळे ते या दोन्ही आघाड्यांपासून समांतर राहून शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता ही प्रतिमा घेऊन लोकांसमोर जातील असे दिसते. महाविकास आघाडी या मतदारसंघात उमेदवार उभा न करता त्यांना बळ देऊ शकते. धैर्यशील माने हेच जर उमेदवार असतील, तर राहुल आवाडे काय करणार यावर आवाडे गटाच्या राजकारणाची दिशा अवलंबून असेल.