कोल्हापूर : समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश ही केवळ औपचारिकता असून तो उद्याही होऊ शकतो. कागल तालुक्यातील त्यांचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार हे ‘कमळ’ चिन्ह घेऊन निवडणूक लढवतील, अशी माहिती भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.येथे आयोजित महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला समरजित घाटगे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे घाटगे यांचा पक्षप्रवेशाच्या विषयावर पडदा पडल्याचे मानले जाते. पाटील म्हणाले, समरजित घाटगे भाजप आणि महायुतीच्या वातावरणात आले आहेत. त्यांचा प्रवेश ही केवळ तांत्रिक गोष्ट आहे. ते आता बैठकीत आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते.गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला होता आणि कागलची विधानसभा निवडणूक लढवली होती. घाटगे यांचा पक्षप्रवेश हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये गैबी चौकामध्ये झाला होता. परंतु त्यांचा विधानसभेला पराभव झाला आणि त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अनेक महिने रंगली होती.
कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अचानक हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची युती झाली. यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे मानले जात होते. ही गोष्ट अधिकृतपणे मंत्री पाटील यांनी रविवारी जाहीर केली.