सम्मेद शेट, अनिश गांधी यांनी एकाच वेळी दिली अनेकांशी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:09 IST2019-06-03T13:07:45+5:302019-06-03T13:09:39+5:30
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनीश गांधी या दोघांनी रविवारी एकाच वेळी ३२ बुद्धिबळपटूंशी प्रदर्शनीय सामना शिवाजी स्टेडियम येथे खेळला. यात सम्मेदने ३२, तर अनीशने ३० जणांशी एकाच वेळी लढत दिली. या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे करण्यात आले होते.

कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे एकाच वेळी अनेकांशी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनीश गांधी याने लढत दिली. या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले होते. (छाया : दीपक जाधव)
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनीश गांधी या दोघांनी रविवारी एकाच वेळी ३२ बुद्धिबळपटूंशी प्रदर्शनीय सामना शिवाजी स्टेडियम येथे खेळला. यात सम्मेदने ३२, तर अनीशने ३० जणांशी एकाच वेळी लढत दिली. या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे करण्यात आले होते.
सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रात अनीश गांधी याने ३0 बुद्धिबळपटूंशी स्वतंत्र पटावर लढत दिली. या ३0 पैकी पाच बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त होते. पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणाºया अनीशने सुरुवातीस सावध व आक्रमक चाली रचत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकला. तोडीस तोड खेळ करीत सर्व प्रतिस्पर्ध्यांनी अनीशची दमछाक करण्याचा प्रयत्न केला; परंतु डावाच्या मध्यपर्वात अनीशने कल्पक चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना गोंधळात टाकले.
हळूहळू एकेकाचे डावावरील नियंत्रण सुटू लागले. त्याचा अचूक फायदा उठवीत त्याने एकेकावर मात करण्यास सुरुवात केली. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच्या सर्व ३0 प्रतिस्पर्ध्यांना साडेतीन तासांत अनीशने पराभूत केले. जयदीप कोळीने अनीशला चांगलेच झुंजविले.
दोन वाजता सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रामध्ये सम्मेद शेटेविरुद्ध ३२ प्रतिस्पर्ध्यांनी भाग घेतला होता, यापैकी १४ बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त होते. पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या सम्मेदने सुरुवातीपासून आक्रमक व जलद चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच जखडून ठेवण्यात यश मिळविले.
नंतर सम्मेदने पटावर गुंता करून प्रतिस्पर्ध्यांना बुचकळ्यात पाडून एकेकावर मात करण्यास सुरूकेले. तीन तासांमध्ये २४ प्रतिस्पर्ध्यांवर त्याने मात केली. शेवटी उरलेल्या आठ प्रतिस्पर्ध्यांना अतिजलद पद्धतीने खेळविण्यात आले.
दीर्घकाळ लढत दिलेल्यांमध्ये तुषार शर्मा, आदित्य सावळकर, शर्विल पाटील, अथर्व चव्हाण, प्रणव पाटील यांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत सम्मेदला झुंज दिली; परंतु अनुभवी सम्मेदने सर्वांवर मात केली. या उपक्रमासाठी भरत चौगुले, उत्कर्ष लोमटे, मनीष मारुलकर, प्रीतम घोडके, तुषार शर्मा यांनी परिश्रम घेतले.