निवास साळोखे यांनी ‘दक्षिण’मधून लढावे
By Admin | Updated: September 4, 2014 00:16 IST2014-09-04T00:16:08+5:302014-09-04T00:16:35+5:30
कार्यकर्त्यांचा आग्रह : उद्या मेळावा

निवास साळोखे यांनी ‘दक्षिण’मधून लढावे
कोल्हापूर : कोल्हापूरच्या टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे. कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांसाठी साळोखे रस्त्यावर उतरले आहेत. टोलविरोधी आंदोलनात त्यांचे योगदान मोठे होते. स्वर्र्गीय श्रीपतराव बोंद्रे यांच्यापासून त्यांचा करवीर तालुक्यात संपर्क आहे. गेली ३५ वर्षे विविध आंदोलनांतून ते ग्रामीण भागातही सक्रिय राहिले आहेत. टोलविरोधी महामोर्चासाठी त्यांनी करवीर तालुक्यात संपर्कदौरे केले आहेत. त्यामुळे ‘दक्षिण’मधूनच त्यांनी उभारावे, यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. निवास साळोखेप्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता इंदिरासागर हॉल, संभाजीनगर येथे आयोजित केला आहे. यामध्ये कार्यकर्त्यांची मते अजमावून घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)
माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याचे समजते. यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, हे कळेल. जनता म्हणत असेल तर सकारात्मक विचार करू.
- निवास साळोखे