उद्धव गोडसेकोल्हापूर : ओडिसातून आणलेल्या गांजाची कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत होलसेल विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. दक्षिण महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या टोळीतील आठजणांना रविवारी (दि. ८) अटक केली असून, त्यांच्याकडून ४१ किलो १९५ ग्रॅम गांजा हस्तगत केला. गांजाच्या तस्करीसाठी वापरलेल्या २ कार, १ दुचाकी आणि ९ मोबाइलसह गांजा असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.दीपक दत्तात्रय पुजारी (वय ३७, रा. सांगली नाका, इचलकरंजी), विवेक मेघदूत शिंदे (२८, रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी), अंकुश प्रताप शिंदे (३०), नंदकिशोर भिकू साठे (३०, दोघे रा. बामणी, ता. खानापूर, जि. सांगली), मनोज मदन गोसावी (२९), राजू अमिन शेख (३०, रा. दोघे रा. अकलूज, ता. माळशिरज, जि. सोलापूर), महेश जम्मू साळुंखे (३२,रा. खरसुंडी, ता. आटपाडी, जि. सांगली) आणि देवदास महादेव तुपे (२१, रा. पालवण, ता. दहीवडी, जि. सातारा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले ते कुंभोज मार्गावर काही तरुण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार नेज येथे सापळा रचून दीपक पुजारी, विवेक शिंदे, अंकुश शिंदे आणि नंदकिशोर साठे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील २१ किलो ७० ग्रॅम गांजा, एक कार, एक दुचाकी आणि पाच मोबाइल असा १६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.अधिक चौकशीत त्यांनी सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथून गांजा विकत आणल्याचे सांगितले. पोलिसांनी खरसुंडी येथील मंदिराचा पुजारी महेश साळुंखे याला अटक करून चौकशी केली असता सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील पुरवठादारांची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी आणखी तिघांना अटक करून २० किलो १२५ ग्रॅम गांजा, एक कार आणि पाच मोबाइल असा १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.ओडिसातून खरेदीओडिसातून प्रतिकिलो पाच हजार रुपये किलोने गांजाची खरेदी करून तो रेल्वेने सोलापूर जिल्ह्यात आणला जात होता. त्याची १० हजार रुपये किलोने होलसेल विक्री केली जात होती. पुढे किरकोळ विक्रीतून याची किंमत २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत पोहोचत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Kolhapur: ओडिसातून आणलेल्या गांजाची दक्षिण महाराष्ट्रात विक्री, आंतरजिल्हा टोळी अटकेत; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
By उद्धव गोडसे | Updated: June 9, 2025 17:43 IST