घरात बसून पगार घेणाऱ्यांनी कामावर यावे, अन्यथा पगार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:09+5:302021-05-09T04:24:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये येथून पुढे कोणतीही बडदास्त चालणार नसून, आतापासूनच संघाचे ‘ओपल’ हॉटेलमधील खाते बंद ...

घरात बसून पगार घेणाऱ्यांनी कामावर यावे, अन्यथा पगार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये येथून पुढे कोणतीही बडदास्त चालणार नसून, आतापासूनच संघाचे ‘ओपल’ हॉटेलमधील खाते बंद करण्याची सूचना नवनिर्वाचित संचालक नविद मुश्रीफ यांनी केली. संचालकांच्या फार्महाऊस, घरात काम करून ‘गोकुळ’चा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजपासूनच कामावर यावे, अन्यथा पुढील महिन्याचा पगार मिळणार नाही, असा दमही त्यांनी दिला.
‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित १७ संचालकांचा शनिवारी कार्यालयीन प्रवेश झाला. सकाळी अकरा वाजता संघाच्या ताराबाई पार्क आवारातील हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावर गेले. तिथे संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यालयीन प्रवेश केला. यावेळी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. तेथून संचालकांनी हलसिध्दनाथाचे दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगले, एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर उपस्थित होते. विरोधी चार संचालक अनुपस्थित होते.
बापसे बेटा सवाई
जिल्हा बँकेची प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात येऊन संचालक मंडळ आल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या कामकाजाला शिस्त लावलीच, त्याचबरोबर गाड्या, भत्ते, जेवणावळी आदी बंद केले. बँकेत येणाऱ्या पाहुण्याला चहा व साधी बिस्किटे देतात, काटकसर करून बँक पाच वर्षांत राज्यात आदर्शवत बनवली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ‘नविद’ यांनी ‘गोकुळ’मधील आर्थिक बाबींना शिस्त लावण्याचा निर्णय घेतल्याने ‘बापसे बेटा सवाई’ अशी चर्चा सुरू आहे.
कोट-
आम्ही ‘गोकुळ’चे संचालक आहोत, मालक नव्हे. दूध उत्पादक शेतकरीच या संघाचे मालक आहेत. दूध उत्पादकांनी आपल्या पोरा-बाळांच्या तोंडचे दूध काढून संघाला घातले आहे. त्या पैशावर आम्ही चैन्या करणे, हे आमच्या नीतीमत्तेत बसत नाही. या दूध संघात विश्वस्तांच्या भूमिकेतूनच काम करू, मालक म्हणून नव्हे, असे नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांनी शनिवारी गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावरील संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (फोटो-०८०५२०२१-कोल-गोकुळ) (छाया- राज मकानदार)