एस. टी. गॅँगचा राजसिंह शेळकेंवर खुनी हल्ला ---

By Admin | Updated: February 16, 2017 18:55 IST2017-02-16T18:55:31+5:302017-02-16T18:55:31+5:30

दोघे जखमी : सागर तहसिलदारसह सहाजणांवर गुन्हा; मध्यरात्रीच्या वेळी गुंडांकडून कृत्य

S. T. Raj Singh Shekhar murderous murderer of gang | एस. टी. गॅँगचा राजसिंह शेळकेंवर खुनी हल्ला ---

एस. टी. गॅँगचा राजसिंह शेळकेंवर खुनी हल्ला ---

कोल्हापूर : शेजारील प्रभागात विकासकामे केल्याच्या रागातून ‘एस.टी.’ गँगच्या गुंडांनी नगरसेवक राजसिंह भगवानराव शेळके यांच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मुक्त सैनिक वसाहत येथे त्यांच्या निवासस्थानासमोर घडली. या हल्ल्यात शेळके यांच्यासह त्यांचा सहकारी दिलीप अशोक भुर्इंगडे (वय ३५, रा. मुक्त सैनिक वसाहत) हे जखमी झाले. रात्री उशिरा रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून व शेळके हे घरी झोपले असताना त्यांना घरातून बाहेर बोलावून त्यांच्यावर अचानक हा खुनी हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, शेळके यांच्या पत्नी रसिका यांनी गुंडांशी प्रतिकार केल्याने आणि आरडाओरडा केल्याने सर्व गुंड पळून गेले. सुमारे पंधरा मिनिटे हल्ल्याचा हा प्रकार चालला होता. या हल्ल्यात गुंडांनी शेळके यांचे कपडे फाडले, चष्मा फोडला, तर गळ्यातील चेनही तोडली.
शेळके यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ‘एस.टी.’ गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार याचा भाऊ सागर तहसीलदार याच्यासह अज्ञात पाच ते सहा गुंडांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. शेळके यांच्यावरील हल्ल्याचे चित्रण त्यांच्या घराच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये कॅमेराबद्ध झाले आहे. घटनेनंतर काही वेळातच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी शेळके आणि भुर्इंगडे यांना तातडीचे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
घटनेनंतर मुक्त सैनिक वसाहतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री पोलिसांनी घटनास्थळी येऊन, परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला. या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजसिंह शेळके यांचा भागातील सहकारी दिलीप अशोक भुर्इंगडे याचा चार दिवसांपूर्वी नोकरीच्या ठिकाणी कामगारांशी वाद झाला होता. त्या वादातून भुर्इंगडेवर शाहूपुरी पोलिसांत तक्रार दाखल झाली होती; पण भुर्इंगडे हा पोलिसांत हजर झालेला नव्हता. हे प्रकरण मिटवावे म्हणून त्याचा नगरसेवक राजसिंह शेळके यांच्याकडे तगादा होता. सागर तहसीलदार यानेही हे प्रकरण मिटवावे म्हणून शेळके यांना बुधवारी रात्री अकरा वाजता फोन केला होता. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास दिलीप भुर्इंगडे हा शेळके यांच्या घरासमोर आला. त्याने शेळके झोपलेले असताना त्यांना फोन करून उठविले, तसेच घरासमोर थांबल्याचे सांगितले.
राजसिंह शेळके हे घरातून बाहेर व्हरांड्यातील मुख्य प्रवेशद्वारात आले. त्यावेळी तेथे गुंड स्वप्निल तहसीलदार याचा भाऊ सागर तहसीलदार याच्यासह अज्ञात पाच ते सहाजण उभे होते. शेळके हे प्रवेशद्वारातून बाहेर रस्त्यावर आले असता अचानक सागरसह या गुंडांच्या टोळीने राजसिंह शेळके यांच्यावर शिवीगाळ करीतच हल्ला केला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेजारी पडलेला मोठा दगड घेऊन त्यांनी शेळके यांच्या अंगावर टाकला. तो दगड त्यांच्या हाताच्या मनगटावर बसल्याने ते जखमी झाले. त्यानंतर एका गुंडाने ‘त्याला सोडू नका; खलास करा,’ असा इतरांना इशारा दिला. त्याच वेळी सागर तहसीलदार याने पुन्हा एक दगड उचलून तो शेळके यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला; पण शेळकेंनी तो चुकविल्याने तो अशोक भुर्इंगडे यांच्या तोंडावर लागला. तेही या हल्ल्यात जखमी झाले. गोंधळ ऐकून शेळके यांच्या पत्नी रसिका शेळके तसेच शेजारील राजू निपाणे हेही धावतच आले. रसिका शेळके यांनी गुंडांच्या तावडीतून शेळके यांना बाजूला करून त्यांना घरात नेले. घराच्या दारातच रस्त्यावर अंधारात सुमारे १५ मिनिटे हे थरारनाट्य सुरू होते. काही वेळातच परिसरातील लोक जमा झाल्याने गुंडांनी दोन दुचाकींवरून पळ काढला.
शेजाऱ्यांनी जखमी दोघांनाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळातच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले हे फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. दोघा जखमींना प्रथमोपचारानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले.




विकासकामांचा श्रेयवाद
प्रभाग क्र. १९, मुक्त वसाहत येथून राजसिंह शेळके हे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते ताराराणी मार्केट विभागीय प्रभाग समितीचे सभापती आहेत; तर सुरेखा शहा या प्रभाग क्र. २०, राजर्षी शाहू मार्केट यार्ड या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. या शहा यांचे नातू म्हणजे ‘एस.टी.’ गॅँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार व सागर तहसीलदार होत. गेल्या वर्षभरात शेळके यांनी आपल्या प्रभागातील विकासकामांबरोबरच शेजारील शाहू मार्केट यार्ड प्रभागातही काही विकासकामे केलेली आहेत. त्याचा राग तहसीलदार याच्या मनात होता. आमच्या प्रभागात विकासकामे का करता? या वादातून सागर तहसीलदार याने सहकाऱ्यांसोबत हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
नगरसेवकांची गर्दी
राजसिंह शेळके हे ‘ताराराणी’चे नगरसेवक असून सुरेखा शहा 'ा काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. शेळके हे हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ताराराणी-भाजप आघाडीचे नगरसेवक विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, किरण नकाते, भगवान काटे, आदींनी रुग्णालयात गर्दी केली होती.
उद्यानातील दिवे फोडले
मुक्त सैनिक वसाहत उद्यानात विकासनिधीतून शेळके यांनी किमती दिवे लावले होते; पण शेळके यांनी मार्केट यार्ड भागातही विकासकामे करण्याचा संबंधच काय? या रागापोटी ‘एस.टी.’ गँगच्या गुंडांनी हे उद्यानातील दिवे चार दिवसांपूर्वीच फोडल्याची चर्चा परिसरात होती.
‘एस.टी.’ गँगची प्रचंड दहशत
मुक्त सैनिक वसाहत, शाहू मार्केट यार्ड, बापट कॅम्प, रुईकर कॉलनी, आदी परिसरात ‘एस.टी.’ गँगची प्रचंड दहशत आहे. या गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार हा १२ सहकाऱ्यांसह ‘मोक्का’अंतर्गत कारवाईखाली कारागृहात आहे. शेळके यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेमुळे ‘एस.टी.’ गँगवर मोक्का कारवाईसाठी पोलिसांना भक्कम पाठबळ मिळणार आहे.
‘सोडू नका, खलास करा’
नगरसेवक शेळके बाहेर आले. बाहेर थांबलेल्या एस. टी. गँगने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. ‘लय शहाणपणा चाललाय तुझा; बघतोच तुला. थांब, खलास केल्याशिवाय राहणार नाही...!’ असे म्हणत, शिवीगाळ करीत मोठमोठे दगड शेळके यांच्या अंगावर फेकून मारले. ‘याला सोडू नका रे, खलास करा!’ असे म्हणत सागर तहसीलदारसह इतर अज्ञात पाच ते सहाजण शेळकेवर अक्षरश: तुटून पडले. त्यांनी शेळके यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
पत्नी आली धावून
मध्यरात्री एक वाजता झोपेतून उठून गेलेल्या शेळके यांचा आरडाओरडा व गोंधळ ऐकून त्यांच्या पत्नी रसिका शेळके धावतच बाहेर आल्या. त्यांनी हल्लेखोरांना काही काळ प्रतिकार केला. त्यांनी शेळके यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवून घरात घेतल्याने ते बचावले. हल्लेखोरांनी शेळके यांच्या पत्नीलाही यावेळी धक्काबुक्की केली, त्यामध्ये त्याही किरकोळ जखमी झाल्या.

Web Title: S. T. Raj Singh Shekhar murderous murderer of gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.