ग्रामीण रुग्णालयाला अखेर स्त्रीरोगतज्ज्ञ मिळाला
By Admin | Updated: February 9, 2015 00:37 IST2015-02-09T00:02:18+5:302015-02-09T00:37:59+5:30
‘लोकमत’चे कौतुक : स्वाभिमानी संघटनेच्या मागणीला यश

ग्रामीण रुग्णालयाला अखेर स्त्रीरोगतज्ज्ञ मिळाला
मुरगूड : मुरगूड शहरासह परिसरातील पन्नासहून अधिक गावांना नवसंजीवनी देणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात स्त्री- रोगतज्ज्ञ नसल्याने महिलांची कुचंबणा होत होती. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून जर डॉक्टर आले नाहीत, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नवीनच हजर झालेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मुकुंद सादिलगे यांचे संघटनेच्या वतीने स्वागत केले. ग्रामीण भागातील महिलांची गैरसोय दूर झाल्याने रुग्णांमधूनही समाधानाची भावना व्यक्त होत आहे.मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय सेवासुविधा देऊ लागल्याने येथे आठवड्यातील सर्वच दिवशी गर्दी असते. स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने महिलांची कुचंबणा होत होती. विशेषत: गरोदर स्त्रियांना खासगी रुग्णालयाचाच आधार घ्यावा लागत होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. व्ही. पी. देशमुख यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले होते. या मागणीला अखेर न्याय मिळाला. आज डॉ. सादिलगे रुग्णालयात रुजू झाले. कागल तालुका संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव भराडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी डॉ. अनिल तिवडे, डॉ. चित्रा पाटील, एम. के. चौगले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी युवा संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी कळमकर, अंबाजी सावंत, रणजित पाटील, अशोक पाटील, विक्रम पाटील, रणजित मोरे, संदीप रामाणे, प्रवीण भराडे, पांडुरंग चौगले, राजू पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. उद्योगपती डॉ. एम. एम. चौगले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चे कौतुक
‘रुग्णालयाला स्त्रीरोगतज्ज्ञ हवा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून स्त्रियांच्या होणाऱ्या गैरसोयींबाबत वास्तव सडेतोड मांडले होते. त्यामुळे शेतकरी
संघटनेचे नेते व पंचायत समितीचे सदस्य अजित पोवार यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले.