प्रश्नपत्रिकेसाठीची धावपळ थांबली
By Admin | Updated: March 19, 2016 00:26 IST2016-03-19T00:17:58+5:302016-03-19T00:26:13+5:30
शिवाजी विद्यापीठ : ‘एसआरपीडी’ तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करा

प्रश्नपत्रिकेसाठीची धावपळ थांबली
संतोष मिठारी - कोल्हापूर परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रश्नपत्रिका वितरणाबाबत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘सिक्युरड रिमोट पेपर डिलिव्हरी’ (एसआरपीडी) म्हणजे गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिकेचे वितरण पद्धतीद्वारे तंत्रज्ञान वापराच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची प्रश्नपत्रिका वितरणातील धावपळ थांबणार आहे. परीक्षेच्या सध्याच्या सत्रातील १८ अभ्यासक्रमांच्या सुमारे दोन हजार प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. वितरणातील धावपळ थांबविण्यासाठी परीक्षा विभागाने प्रायोगिक तत्त्वावर एप्रिल २०१५ मधील परीक्षेवेळी अभियांत्रिकीतील काही व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी एसआरपीडी वापरले. त्यातील यशस्वितेनंतर आता १८ अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकांच्या वितरणासाठी त्याचा वापर होत आहे. त्यातून या प्रक्रियेतील गोपनीय व नियंत्रण वाढविण्यास मदत होणार आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी टप्प्याटप्प्याने याचा वापर होणार आहे.
प्रश्नपत्रिका क्षणात मिळते
एसआरपीडी प्रक्रियेअंर्तगत परराज्यातील गोपनीय प्रेसमध्ये सांकेतिक स्वरूपात प्रश्नपत्रिकेचे टंकलेखन (टायपिंग) केले जाते. तेथून ती थेट विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिली जाते. एसआरपीडीमध्ये महाविद्यालयांच्या प्राचार्यांना एक युजर आयडी आणि पासवर्ड दिला आहे. त्याची लिंक विद्यापीठाच्या वेबपोर्टलशी जोडली आहे. पेपरच्या दोन तास आधी वेबपोर्टलवरील सांकेतिक (कोडिंग) स्वरूपातील संबंधित प्रश्नपत्रिका प्राचार्यांनी ‘डाऊनलोड’ करून घ्यायची. त्यानंतर पेपरच्या अर्धा तासापूर्वी संबंधित प्रश्नपत्रिका विसांकेतिक (डिकोडिंग) करण्याचा पासवर्ड पाठविला जातो. त्यानंतर १५ मिनिटांनी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्याच्या छायांकित प्रती काढून त्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या पद्धतीमुळे प्रश्नपत्रिका क्षणात व सुरक्षित परीक्षा केंद्रांवर उपलब्ध होत आहे.
छपाई खर्च, वेळेची बचत
जुन्या पद्धतीनुसार प्रश्नपत्रिकांची छपाई विद्यापीठाच्या प्रेसमध्ये करून त्या परीक्षा केंद्रावर वितरीत केल्या जातात. त्यात छपाई, पॅकिंगसाठी खर्च होतो. दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका केंद्रांवर पाठवाव्या लागतात.
ते टाळण्यासह कागदाच्या कमी वापराबाबत कुलपती आणि राजेश अगरवाल समितीच्या निर्देशानुसार एसआरपीडीचा वापर केला जात असल्याचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, एसआरपीडीमुळे अनावश्यक खर्च आणि वेळेची बचत होणार आहे. विद्यापीठातर्फे प्रत्येक सत्रात विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे सहा हजार प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाते. त्यातील दोन हजार प्रश्नपत्रिकांचे एसआरपीडीद्वारे पहिल्या टप्प्यात वितरण केले जाणार आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती वाढविली जाईल.
विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करा
युवक काँग्रेसची मागणी : परीक्षेबाबत शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे अभियांत्रिकी व एलएल.बी. परीक्षांचे निकाल उशिरा लागलेले आहेत. त्याचबरोबर फोटो कॉपीची मागणी केलेल्या दहा हजार विद्यार्थी हेलपाटे मारून थकले आहेत, विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करा, अशी मागणी शहर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष दीपक थोरात यांनी शुक्रवारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे केली.
अभियांत्रिकी विभागाचा पहिल्या सत्राचा निकाल दि. ८ जानेवारी ते १६ फेबु्रवारी या कालावधीत जाहीर झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळून आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी रीतसर फोटो कॉपीची मागणी केली, वीस हजार विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली असताना अद्याप दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या कॉपी मिळालेल्या नाहीत. विद्यापीठातील काही कर्मचारी व परीक्षा विभाग यांच्यामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुसीमुळेच परीक्षा विभागाचे गणित बिघडल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
परीक्षा नियंत्रकांना पत्रकारांचे वावडे का?
गेले आठवड्यात याबाबत परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याकडे विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्यासाठी गेलो. त्यावेळी पत्रकार उपस्थित असल्याने त्यांनी आमचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. नियंत्रकांना पत्रकारांचे वावडे का? अशी विचारणा थोरात यांनी केली.