‘देवा’च्या जमिनीसाठी न्यायालयात ‘धावा’!
By Admin | Updated: September 26, 2015 00:18 IST2015-09-25T23:53:42+5:302015-09-26T00:18:24+5:30
करारपत्रांचा आधार : न्यायालयानेही घातली धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीची अट--‘इंचनाळ गणपती’च्या जमिनीची कुळकथा

‘देवा’च्या जमिनीसाठी न्यायालयात ‘धावा’!
राम मगदूम-गडहिंग्लज इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री गणपती देवाच्या जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी यांनी नेमलेले ‘वटमुखत्यार’ मनोहर बाळकृष्ण जोशी यांनी संबंधित जमिनीच्या विक्रीपोटी रक्कम स्वीकारून जमीन खरेदी देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे करारपत्र करून घेतलेल्या आनंदराव धोंडिबा पोवार यांनी जमिनीचे खरेदीपत्र होऊन मिळावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयानेदेखील धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीनेच या जमिनीचा ‘व्यवहार’ करावा, असा निकाल दिला.
वटमुखत्यार मनोहर जोशी-दंडगे यांनी देवस्थानच्या व्यवस्थापनेसाठी उत्पन्न अपुरे आणि प्रत्यक्ष जमिनी कसणे अडचणीचे होऊ लागल्याने अनिलकुमार राजाराम दड्डीकर यांच्याकडून १० डिसेंबर २००० रोजीच्या करारपत्राने दोन लाख ८५ हजार रुपये स्वीकारले व दहा वर्षे व्याजामध्ये उपभोगण्यास जमीन दिली. मात्र, सदरच्या व्याजात देवस्थानचे व्यवस्थापन होईनासे झाल्याने त्यांनी या जमिनी १६ लाखांच्या मोबदल्यात खरेदी देण्याचे ठरवून संचकारादाखल दहा लाख स्वीकारून तसे करारपत्र आनंदराव पोवार यांना १७ आॅक्टोबर २००३ रोजी लिहून दिले.
दरम्यान, उर्वरित रक्कम घ्या व जमिनीचा कब्जा द्या, तसेच खरेदीपत्र पूर्ण करून द्या, अशी विनंती वेळोवेळी पोवार यांनी मनोहर यांच्याकडे केली. त्यावेळी दड्डीकर यांचे पैसे भागविण्यासाठी त्यांनी पोवारांकडून दोन लाख ८५ हजार रुपये घेतले व जमिनीचा कब्जा पोवारांच्या ताब्यात दिला. त्याबाबतचे पुरवणी करारपत्र ११ डिसेंबर २००९ रोजी करून दिले.
तथापि, धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन खरेदीपत्र पूर्ण करून देण्यास मनोहर जोशी-दंडगे यांनी टाळाटाळ केल्यामुळे पोवारांनी करारपत्राप्रमाणे जमिनीचे खरेदीपत्र होऊन मिळण्यासाठी गडहिंग्लजच्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात २८ डिसेंबर २००९ला दावा दाखल केला. या दाव्याची गुण-दोषांवर चौकशी होऊन करारपत्राप्रमाणे उर्वरित रक्कम दोन लाख ६९ हजार ५०० रुपये स्वीकारून सहा महिन्यांच्या आत धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन खरेदीपत्र पूर्ण करून द्यावे, आणि त्यांनी परवानगी नाकारल्यास दरसाल ६ टक्के व्याजदराने १३ लाख ३० हजार ५०० रुपयांची वसुली पोवारांना करता येईल, असा निकाल न्यायालयाने २२ सप्टेंबर २०१४ रोजी दिला.
या दाव्याच्या निकालानंतर पोवार यांनी गट नंबर २७३/१अ व २७३/१ब चे पीक पाहणी सदरी नोंद होण्यासाठी २० जानेवारी २०१५ व ११ फेब्रुवारी २०१५, असे दोन अर्ज तहसीलदारांकडे केले. त्यानुसार आॅगस्ट २०१५ मध्ये पीक पाहणी संदर्भात गावभेठीची सूचना तहसीलदारांनी वहिवाटदारांना नोटिसीद्वारे दिल्याचे ग्रामस्थ व गणेशभक्तांना समजले. त्यामुळेच त्यांनी देवस्थानची जमीन वाचविण्यासाठी तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि धर्मादाय आयुक्तांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा दरवाजा ठोठावला आहे. (समाप्त)
‘जमीन खरेदी’साठी असा झाला खटाटोप
१७ आॅक्टोबर २००३ : देवस्थानची सहा एकर २९ गुंठे जमीन आनंदराव पोवार यांना १६ लाखाला खरेदी देण्याचे ठरवून त्यापोटी दहा लाख संचकार स्वीकारून वटमुखत्यार मनोहर जोशी यांनी पोवारांना करारपत्र करून दिले.
११ डिसेंबर २००९ : अनिलकुमार दड्डीकर यांची रक्कम भागविण्यासाठी मनोहर जोशी यांनी दोन लाख ८५ हजार रूपये घेतले व जमिनीचा कब्जा पोवारांच्या ताब्यात दिला.
२८ डिसेंबर २००९ : जमीनीचे खरेदीपत्र होऊन मिळण्यासाठी पोवारांची न्यायालयात धाव.
२२ सप्टेंबर २०१४ : प्रतिवादींनी सहा महिन्यांच्या आत धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन खरेदीपत्र पूर्ण करून द्यावे व परवानगी न मिळाल्यास दरसाल ६% टक्के व्याजदराने १३ लाख ३० हजार ५०० रूपयांची वसुली वादींना करता येईल, असा न्यायालयाचा निकाल आहे.