महाराष्ट्रातील राज्यकर्ते दारू उत्पादक
By Admin | Updated: July 4, 2015 00:21 IST2015-07-04T00:21:14+5:302015-07-04T00:21:41+5:30
लक्ष्मण माने : ‘भटके विमुक्त’ संघटनेतर्फे सोमवारी मोर्चा

महाराष्ट्रातील राज्यकर्ते दारू उत्पादक
कोल्हापूर : महाराष्ट्रातील राज्यकर्ते दारूचे उत्पादक असल्याचा आरोप, माजी आमदार लक्ष्मण माने यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. भटके विमुक्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
माने म्हणाले, २० जूनला मालवणी, मुंबई येथे विषारी दारू पिऊन १०४ लोक प्राणास मुकले. हे निमित्त करून राज्यभरातील कंजारभाट, पारधी, वडार आणि इतर जमातींच्या वसाहतींवर पोलिसांनी धाडी टाकणे सुरू केले आहे. वस्तुत: दारू काही कंजारभाट, पारधी, वडार किंवा कैकाडी जमाती विकत नाहीत. दारूभट्ट्या तर आता सर्व साखर कारखाने ‘डिस्टिलरी’च्या गोंडस नावाखाली तयार करून राजरोस सरकारदरबारी परवाने घेऊन विकत आहेत. आमचा दारूबंदीस पाठिंबा आहे परंतु ती करायची तर सर्वच प्रकारची दारू बंद करा. शासन ढोंगीपणा करत आहे. पिढ्यान्-पिढ्या दारू गाळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे आहे त्यांची हातभट्टी. यामधून निर्माण होणारे अल्कोहोल हे वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात परदेशातून आयात होणाऱ्या अल्कोहोलऐवजी वापरल्यास शासनाचे कोट्यवधी रुपये वाचतील परंतु आमच्या दारूला विषारी ठरवायचे व राज्यकर्त्यांच्या दारूला प्रतिष्ठा द्यायची हे मनुस्मृतीतील कायद्याला धरूनच आहे.
या विरोधात तसेच शहरात माकडवाले, पारधी, डोंबारी, कैकाडी, गोंधळी, भोई, डवरी, जोशी या समाजातील लोकांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी जागा दिल्या आहेत, परंतु तेथील जागांवर आजतागायत तेथील रहिवाशांची नावे लागलेली नाहीत. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात होईल. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीज मार्गावरून हा मोर्चा जाईल.
यावेळी शाबू दुधाळे, सज्जनसिंग चितोडिया, समशेरसिंग कलानी, जगन्नाथराव जाधव, विलासराव तामायचीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)