सत्ताधाऱ्यांनी कमावले, विरोधकांनी गमावले !
By Admin | Updated: June 1, 2015 00:11 IST2015-05-31T22:40:59+5:302015-06-01T00:11:52+5:30
गडहिंग्लज अर्बन बँक निवडणूक : ‘लोकमत’ने मांडली बिनविरोध निवडणुकीची भूमिका; अभिनंदनाचा वर्षाव

सत्ताधाऱ्यांनी कमावले, विरोधकांनी गमावले !
राम मगदूम - गडहिंग्लज -अपेक्षेप्रमाणे गडहिंग्लज अर्बन बँकेची निवडणूक अखेरीस बिनविरोध झाली. या बहुचर्चित निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ‘कमावले’, तर विरोधकांनी ‘गमावले’ अशी स्थिती आहे. बँकेच्या भल्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच भूमिका ‘लोकमत’ने सुरुवातीपासून घेतली होती. त्यास दाद मिळाली. निवडणूक बिनविरोध होण्यात विधायक भूमिका बजावल्याबद्दल ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
१९५० मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने सीमाभागात नावलौकिक असणाऱ्या गडहिंग्लज बाजारपेठेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे समस्त गडहिंग्लजकरांची ‘अस्मिता’ बनलेल्या या बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशीच भूमिका सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंंतकांची होती. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीला आक्षेप असणाऱ्या बँकेच्या काही ‘हितचिंतकांनी’ त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘बँक बचाव’चे आवाहन करीत विरोधी परिवर्तन पॅनेलने मोर्चेबांधणी केली.
निवडणूक लागून आरोप-प्रत्यारोप झाल्यास ठेवीदार विचलित होतील आणि त्यांचा बँकेच्या सांपत्तिक स्थितीवर परिणाम होईल म्हणून तडजोडीचे प्रयत्न सुरू झाले. आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांनीही दोन्ही बाजूच्या मंडळींना सबुरीचा सल्ला दिला. बिनविरोधाच्या हालचालींना गती मिळाली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला घाळी यांनीही यात पुढाकार घेतला. डॉ. नंदिनी बाभूळकर, उदयराव जोशी, किशोर हंजी, सुकाणू समितीचे शिवगोंडा पाटील, कृष्णाप्पा मुसळे, नागाप्पा कोल्हापुरे, हरिभाऊ चव्हाण, आदींच्या प्रयत्नाने निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
तथापि, आपल्या वाट्याला आलेल्या चार जागांवर कुणाला पाठवायचे यावर एकमत न झाल्यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. चार जाणती मंडळी संचालक मंडळावर पाठवून कारभारात सहभागी होण्याची आणि चुकीचा कारभार होत असल्यास त्यावर अंकुश ठेवण्याची संधी विरोधकांनी गमावली आहे.
सध्या बँकेत १६० कोटींच्या ठेवी आहेत. मुख्यालयासह गडहिंग्लजला १, कडगावला १, कोल्हापुरात ३ व जयसिंगपुरात १, अशा सहा शाखा आहेत. मात्र, बँकेचे वयोमान लक्षात घेता अपेक्षित शाखा विस्तार झालेला नाही. शाखा विस्ताराबरोबरच व्यवसायवृद्धीसाठीही नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत. अलीकडे राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बँकेच्या स्पर्धेमुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. बदलत्या काळाची आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित करण्याबरोबरच एटीएम, एसएमएस व इंटरनेट बँकिंग, आदी अत्याधुनिक सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात.
कारभाराची संधी; पण जबाबदारीही वाढली
अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या बँकेच्या यशात संस्थापक अध्यक्ष शिवपुत्राप्पा दड्डी यांच्यापासून विद्यमान अध्यक्ष रवींद्र आजरी आणि पहिले व्यवस्थापक गुरुसिद्धाप्पा गाडवी यांच्यापासून विद्यमान सरव्यवस्थापक किरण तोडकर आणि सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचेही बहुमोल योगदान असल्यामुळे त्यांचा ‘सन्मान’देखील जपायला हवा. पुन्हा एकहाती कारभाराची संधी मिळाल्याने सत्ताधाऱ्यांनी ‘कमावले’ असले तरी त्यांची जबाबदारीही वाढली आहे.